हेमंत गोडसेंच्या प्रचारपत्रकात झळकली राज ठाकरेंची छबी, मनसे आणि गोडसेंचं 'असं' आहे विशेष नातं
Nashik Lok Sabha Election 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची छबी असणाऱ्या प्रचारपत्रकाचे हेमंत गोडसेंच्या कार्यकर्त्यांकडून वाटप सुरू झाले आहे. हेमंत गोडसे आणि मनसेचे विशेष नातं आहे.
Hemant Godse : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी (Nashik Lok Sabha Constituency) शिवसेना ठाकरे गटाकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राजाभाऊ वाजे यांच्याकडून प्रचाराला देखील सुरुवात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महायुतीत (Mahayuti Seat Sharing) मात्र नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे.
एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemat Godse) हे पुन्हा एकदा उमेदवारीसाठी जोर लावत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे देखील नाशिकमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. तसेच नाशिक भाजपने (BJP) देखील या जागेवर दावा ठोकल्याने नाशिकच्या जागेचा गुंता आणखी वाढला आहे.
गोडसेंना कामाला लागण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
उमेदवारीसाठी खासदार हेमंत गोडसे हे सातत्याने ठाणेवारी करत आहेत. कालच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी खासदार हेमंत गोडसे यांना कामाला लागण्याचे आदेश दिल्याचे समजते. त्यामुळे आता हेमंत गोडसे यांनी प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
राज ठाकरे यांची छबी असणाऱ्या प्रचारपत्रकाचे वाटप
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची छबी असणाऱ्या प्रचारपत्रकाचे हेमंत गोडसेंच्या कार्यकर्त्यांकडून वाटप सुरू झाले आहे. यानिमित्ताने हेमंत गोडसे आणि मनसेच्या नात्याचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. छगन भुजबळ, हेमंत गोडसे यांच्यासह रोज नवनवीन नावे नाशिकमधून समोर येत आहेत. मात्र गोडसे यांनी प्रचाराचे नारळ फोडल्याचे दिसून येत आहे.
हेमंत गोडसेंचं मनसेसोबत विशेष नातं
दरम्यान, हेमंत गोडसे हे सध्या शिवसेना शिंदे गटात असून ते नाशिकचे विद्यमान खासदार आहेत. हेमंत गोडसे यांच्या राजकारणाची सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून (MNS) झाली. २००७ ते २०१२ या काळात नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. पुढे २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत विजय मिळवित त्यांनी शहराच्या राजकारणात प्रवेश केला. तत्पूर्वी, २००९ च्या निवडणुकीतही त्यांनी 'मनसे'तर्फे प्रथमच खासदारकीची निवडणूक लढवली होती. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी त्यांचा पराभव केला होता. आता 2024 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा हेमंत गोडसे यांच्या प्रचार पत्रकावर राज ठाकरेंचा फोटो छापण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आणखी वाचा