मोठी बातमी! मनमाडमधील पेट्रोल-डिझेल टँकर चालक पुन्हा संपावर; राज्यात पुन्हा इंधन टंचाईची शक्यता
Truck Driver Strike : टँकर चालकांनी 'स्टिअरिंग छोडो' आंदोलनाची घोषणा करत संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे मनमाडच्या इंधन प्रकल्पातून होणारा इंधन पुरवठा ठप्प होणार असल्याची शक्यता आहेत.
नाशिक : नवीन वाहन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) टँकर चालक संपावर गेले आहेत. मध्यरात्री 12 वाजेपासून टँकर चालकांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. टँकर चालकांनी 'स्टिअरिंग छोडो' आंदोलनाची घोषणा करत संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे मनमाडच्या इंधन प्रकल्पातून होणारा इंधन पुरवठा ठप्प होणार असल्याची शक्यता आहेत. तसेच, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व खांदेशचा इंधन पुरवठा ठप्प होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाची जबाबदारी घेण्यासाठी कोणेही तयार नसल्याचे देखील बोलले जात आहे.
गेल्या आठवड्यात ट्रक चालक आणि पेट्रोल-डिझेल टँकर चालक यांनी संपाची हक दिली होती. नवीन वाहन कायद्याला विरोध करत ट्रक चालक संपत सहभागी झाले होते. मात्र, सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेण्यात आला होता. परंतु, आता पुन्हा एकदा आजपासून ट्रक चालक आणि पेट्रोल-डिझेल टँकर चालक यांनी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा पेट्रोल-डीझेलची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे नाशिकमधील मनमाडच्या पानेवाडी इंधन प्रकल्पातील पेट्रोल-डिझेल टँकर चालक देखील या संपात सहभागी झाले असल्याचे समोर येत आहे.
महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी संपाचे परिणाम
नाशिक जिल्ह्यातील मनमाडमधून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व खांदेशमधील जिल्ह्यांना इंधन पुरवठा केला जातो. त्यामुळे मनमाड येथील इंधन प्रकल्पातील इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालक यांनी पुकारलेल्या संपानंतर याचे परिणाम जवळपास महाराष्ट्रातील बहुतांश पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे टँकर चालकांच्या संपाचा सर्वाधिक परिणाम नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून यावर तोडगा काढण्यासाठी कोणते पाऊलं उचलले जाते हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
पुन्हा पेट्रोल-पंपावर गर्दी...
ट्रक चालक पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची एक ऑडीओ क्लिप मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे नागरिक इंधन भरण्यासाठी पेट्रोल-पंपावर गर्दी करत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे कृत्रिम इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे अद्यापही कुठेही इंधन टंचाई नसल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नयेत असेही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
पेट्रोल पंप बंदची अफवा, संभाजीनगर शहरातील नागरिकांची इंधन भरण्यासाठी तुफान गर्दी