North Maharashtra Rain : पावसाचं तांडव! पोल्ट्री फॉर्मची भिंत कोसळून 800 कोंबड्या दगावल्या, अनेक भागात शिरलं पाणी; नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात कोसळधार
North Maharashtra Rain : मुसळधार पावसाने नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात मोठं नुकसान झाल्याचे चित्र आहे.

North Maharashtra Rain : उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नाशिक (Nashik), अहिल्यानगर (Ahilyanagar), जळगाव (Jalgaon), धुळे (Dhule) आणि नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांना नदी-नाल्याचं स्वरूप आलं असून, कुशावर्त तीर्थ परिसरात पाणी साचल्यामुळे धार्मिक विधींसाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे. रामकुंड परिसरात गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, मंदिर परिसर जलमय झाला आहे. गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणातून 4500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी नाशिक शहरातील गोदावरी किनाऱ्यावरील मंदिरांसह अनेक लहान दुकानं, हॉटेल्स पुराच्या पाण्यात सापडली आहेत.
येवला, मनमाड परिसरात मुसळधार पाऊस (Nashik Rain)
येवला तालुका : येवला शहरात व विंचूर चौफुली परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरमध्ये पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. उंदीरवाडी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. बल्हेगाव येथे पोल्ट्री फॉर्मची भिंत कोसळून 800 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत.
दुगलगाव : येथील मका, सोयाबीन, बाजरी यासारखी काढणीला आलेली पिकं पूर्णतः पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनाम्यांची मागणी करण्यात येत आहे.
मनमाड : पांझण व रामगुळणा नद्यांना मोसमातील पहिल्या पुराचा फटका बसला आहे. शहरातील काही भागात पाणी शिरले असून, प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शिर्डी व राहाता तालुक्यात पावसाचा जोर, महामार्ग ठप्प (Ahilyanagar Rain)
शिर्डी व अहिल्यानगर जिल्हा : राहाता तालुक्यातील अनेक भागांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. नगर-मनमाड महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. शिर्डीतील कालिका नगरसह अनेक भागांमध्ये घरांत पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. काही ठिकाणी नवरात्र उत्सवाचे मंडप कोसळल्याचेही वृत्त आहे. शिर्डीत रात्री दोनजण ओढ्यात वाहून गेले होते, मात्र प्रशासनाने त्यांना वाचवले आहे.
जळगाव जिल्ह्यात पावसाचा प्रचंड फटका (Jalgaon Rain)
पाचोरा तालुका : हिवरा नदीला पूर आला असून, शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याची शक्यता आहे.
चाळीसगाव तालुका : मुसळधार पावसामुळे काढणीवर आलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डोंगरी व तितूर नद्यांना मोठा पूर आला असून, नदीकाठच्या नागरिकांना रात्री सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. चाळीसगाव शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून, हजरत पीर मुसा कादरी बाबा दर्गा परिसरही पाण्याने वेढलेला आहे.
धुळे जिल्ह्यातही यलो अलर्ट, अक्कलपाडा धरणातून विसर्ग (Dhule Rain)
धुळे जिल्ह्याला आज हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. रात्रभर पावसाने हजेरी लावली असून सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. जिल्ह्यात धुळे शहर, धुळे तालुका आणि साक्री तालुक्यात पावसाची दमदार हजेरी लागत असून यामुळे शेती पिकांचे नुकसान देखील होत आहे. काढणीला आलेला कापूस सडून जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणातून आज सकाळी 7 वाजता 11 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून पांझरा नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पिंपळगाव उंडा येथे महिलेचा मृत्यू (Ahilyanagar Rain)
जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथे घराची भिंत कोसळून 75 वर्षीय पारुबाई किसन गव्हाणे यांचा मृत्यू झाला. ही घटना अतिवृष्टीमुळे घडली असून, ती अत्यंत दुर्दैवी आहे.
नंदुरबारमध्ये जोरदार वादळी पाऊस (Nandurbar Rain)
नंदुरबार शहरासह जिल्ह्यात शनिवारी 27 सप्टेंबर रोजी विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नंदुरबारातील खोडाई मातेच्या यात्रेत आलेल्या भाविकांसह व्यावसायिकांची तारांबळ उडाली. नंदुरबार जिल्ह्यात 29 सप्टेंबरपर्यंत काही ठिकाणी वादळ वारा, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आणखी वाचा
























