Nitin Gadkari : 'माकडाच्या हातात कोलीत देण्यापेक्षा मतदार सुज्ञ; नितीन गडकरींचा इंडिया आघाडीला टोला
Nitin Gadkari : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला.
नाशिक : माकडाच्या हातात कोलीत देण्यापेक्षा मतदार सुज्ञ आहे. त्यांना माहीत आहे मतदानाच्या वेळी काय करायचे, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी इंडिया आघाडीला (India Aghadi) लगावला. आज दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या (Dindori Lok Sabha Constituency) महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेतून ते बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले की, आज जयचंद कासलीवाल यांची आठवण आली. जयचंद कासलीवाल यांनी या भागात भाजपसाठी मोठे काम केले आहे. त्या या ठिकाणाहून विधान मंडळात निवडून आले. त्यांना मी आदरांजली वाहतो. हा परिसर शेतीच्या दृष्टीने आदर्श परिसर आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी येथे चांगले काम करून नावलौकिक मिळवला.
नितीन गडकरींचा कानमंत्र
आपल्या शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या पाण्याची आहे. मला जलसंपदा विभागाचा मंत्री म्हणून काम केले आहे. त्या काळात मी महाराष्ट्राला 18 हजार कोटी रुपयांचा निधी दिला. जे प्रकल्प 50 टक्के पूर्ण झाले होते त्याचे काम पूर्ण करण्यासाठी हे पैसे देण्यात आले. डॉ. आहेर असल्यापासून येथील अनेक लोक मागणी करत होते की सह्याद्रीच्या पठारावरील बरेचसे पाणी अरबी समुद्रात वाहून जाते. म्हणून नार पार प्रकल्पाची चर्चा होते. ते पाणी आपण गोदावरीत आणायचे. ठिकठिकाणी साठवायचे आणि जायकवाडीपर्यंत धरण भरून घ्यायचे अशी कल्पना होती. मात्र या प्रकल्पाला विरोध झाला. त्यामुळे काही अडचणी आल्या. मात्र आता हे पाणी अडवून नाशिक, अहमदनगर आणि मराठवाड्याला पाणी मिळण्यासाठी आपण योजन केली आहे. मला विश्वास आहे की, ही योजना मार्गी लावण्या करिता आपण नक्कीच प्रयत्न करू. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा, असा कानमंत्र त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.
विदर्भ म्हणजे नापास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा
आमची विखे साहेबांसारखी स्थिती नाही, तुम्ही भाग्यवान आहात. उसाच्या बाबतीत विदर्भ म्हणजे नापास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा. 100 पैकी 20 पेक्षा कमी मार्क्स असलेले. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मेरीट मधले विद्यार्थी आणि मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लास मधले आहे. मी विदर्भात गेल्या 12 वर्षांपासून तीन साखर कारखाने चालवतो. म्हणजे खडकावर डोकं आपटण्याचा प्रोगाम आहे. मागील वर्षी मला एका एकरात 88 टन ऊस मिळाला. जे सगळे जलसंवर्धनामुळे शक्य झाले.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसते तर रस्ते झाले नसते
शेतकरी अन्नदातासोबत ऊर्जा दाता, इंधन दाता झाला झाला. पेट्रोल ऐवजी इथेनॉलचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर आहे. पुढच्या वर्षी इलकेट्रिकवर चालणारा ट्रॅक्टर येणार आहे. मी स्वप्न दाखविणारा नेता नाही मी जे बोलतो ते करतो जे करू शकतो तेच बोलतो. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसते तर रस्ते झाले नसते. तुमचे मत तुमचं भविष्य ठरविणार आहे.
समाज बदलायचा असेल तर गाव समृद्ध करणे गरजेचे
आता स्मार्ट सिटीसोबत स्मार्ट व्हिलेज योजना सुरु करायची आहे. गाव समृद्ध करायचे आहे. गावातील तरुणांना काम मिळवून द्यायचे आहे. हा देश समृद्ध, शक्तिशाली, महागुरू झाला पाहिजे. समाज बदलायचा असेल तर गाव समृद्ध करणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात असं धोरण करू की निर्यात बंदी केली जाणार नाही.
देशाचे संविधान कुणी बदलू शकत नाही
एनडीएला 400 जागा मिळाल्या तर संविधान बदलणार,असे विरोधक म्हणत आहेत. पण मी कायद्याचा विद्यार्थी आहे. कुठल्याही परिस्थितीत आपल्या देशाचे संविधान कुणी बदलू शकत नाही. घटनेची मुलभूत तत्व बदलता येत नाही. 80 वेळा संविधान तोडायचे काम कुणी केले असेल तर ते काँग्रेसने केले आहे. माकडाच्या हातात कोलीत देण्यापेक्षा मतदार सुज्ञ आहे. त्यांना माहीत आहे मतदानाच्या वेळी काय करायचे, असा टोला त्यांनी यावेळी इंडिया आघाडीला लगावला आहे.
आणखी वाचा