Nashik Tree Cutting: गिरीश महाजनांनी राजमुद्रीला जाऊन निवडलेले झाडं नाशिकच्या सीमेवर दाखल, आधी 15 हजार झाडांची लागवड, नंतर तपोवन वृक्षतोडीचा निर्णय होणार
Nashik Tree Cutting: राजमुद्री येथून आणलेली झाडे आता टप्याटप्याने नाशिकमध्ये दाखल होऊ लागली असून पहिला ट्रक शहराच्या सीमेपर्यंत पोहोचला आहे.

Nashik Tree Cutting: तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य 1800 वृक्षतोडीबद्दल (Nashik Tapovan Tree Cutting) शहरात तीव्र विरोध सुरू असताना, राज्य सरकारने (Maharashtra Government) मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीद्वारे पर्यावरण संतुलन राखण्याचा निर्णय घेतला आहे. याच मोहिमेअंतर्गत राजमुद्री येथून आणलेली झाडे आता टप्याटप्याने नाशिकमध्ये दाखल होऊ लागली असून पहिला ट्रक शहराच्या सीमेपर्यंत पोहोचला आहे.
Nashik Tree Cutting: महाजनांनी स्वतः राजमुद्रीला जाऊन निवडली 15 हजार झाडे
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वीच दक्षिण भारतातील राजमुद्री येथे भेट देत झाडांची निवड केली. सुमारे 15 फूट उंचीची 15 हजार देशी झाडे वड, पिंपळ, निंब, जांभूळ, आंबा आदींचा समावेश आहे. ठिबक सिंचन प्रणालीसह जैविक खतांचा वापर करून मनपा उद्यान विभागाकडून झाडांच्या देखभालीची व्यवस्था केली जाणार आहे. राजमुद्री येथून झाडे घेऊन पहिला ट्रक नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर शहरात लागवडीची तयारी वेगात सुरू होणार आहे.
Nashik Tree Cutting: सोमवारपासून मोठी वृक्षलागवड सुरू; महाजन उपस्थित राहणार
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत सोमवारपासून महाजनांच्या उपस्थितीत वृक्षलागवड मोहिमेला औपचारिक सुरुवात होणार आहे. यात नाशिक मनपा, सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींचा सहभाग असणार आहे. शहराच्या विविध भागांमध्ये एकाच वेळी झाडे लावण्याची मोठी मोहीम राबवण्यात येणार आहे. हरातील वेगवेगळ्या ठिकाणी, वड, पिंपळ, निंब, जांभूळ, आंबा या देशी वृक्षांची लागवड केली जाणार आहे.
Nashik Tree Cutting: प्रथम वृक्षलागवड, नंतर तपोवनातील झाडांचा निर्णय
तपोवन परिसरातील साधूग्रामसाठी होणाऱ्या वृक्षतोडीला नागरिक आणि पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध असल्याने, सरकारने आधी वृक्षलागवडीला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. साधूग्रामसाठी वृक्षतोड होणाऱ्या 1800 झाडांपैकी बहुतांश झाडांचे पुनर्रोपण करण्याची भूमिका सरकारने स्पष्ट केली आहे. "आधी 15 हजार वृक्ष लावून, नंतरच तपोवनातील झाडांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल,” असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. यापूर्वी साधूग्राम परिसरातील एक्झिबिशन सेंटरचे टेंडरही रद्द करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























