Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा तापलेला असतानाच चार एसटीपींसाठी 1270 झाडांवर कुऱ्हाड, बदल्यात 17,680 रोपांची लागवड केल्याचा नाशिक मनपाचा दावा
Nashik Tree Cutting: नाशिक महापालिकेने चार मलनिस्सारण प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी तब्बल 1270 झाडे तोडल्याची कबुली दिली आहे.

Nashik Tree Cutting: नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा (Nashik Tapovan Tree Cutting) मुद्दा राज्यभरात तापलेला असतानाच नाशिक महापालिकेने (Nashik Municipal Corporation) चार मलनिस्सारण प्रकल्पांच्या (STP) विस्तारीकरणासाठी तब्बल 1270 झाडे तोडल्याची (Tree Cutting) कबुली दिली आहे. विशेष म्हणजे, त्याच्या बदल्यात 17,680 रोपांची लागवड करण्यात आल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे.
Nashik Tree Cutting: 1728 पैकी 458 झाडे वाचवली; 1270 वृक्षतोडीची कबुली
महापालिकेच्या पंचक, चेहडी, आगर टाकळी आणि तपोवन येथील चार एसटीपी केंद्रांच्या विस्तारीकरणासाठी एकूण 1728 झाडे तोडण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र त्यापैकी 458 झाडे वाचवण्यात आली, तर उर्वरित 1270 झाडे प्रत्यक्ष तोडल्याचे महापालिकेने अधिकृतपणे स्पष्ट केले.
Nashik Tree Cutting: 1 कोटी 76 लाख रुपयांची भरपाई
वृक्षतोडीच्या बदल्यात महापालिकेच्या मलनि:स्सारण विभागाकडून 1 कोटी 76 लाख रुपये भरपाई म्हणून स्वीकारण्यात आली आहे. या निधीचा वापर पर्यावरणीय भरपाई प्रकल्पांसाठी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.
Nashik Tree Cutting: फाशीच्या डोंगराजवळ 17,680 नव्या रोपांची लागवड
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, वृक्षतोडीची भरपाई म्हणून फाशीच्या डोंगाजवळ 17,680 झाडे लावण्यात आली असून त्यापैकी मोठ्या प्रमाणात स्थानिक प्रजातींचा समावेश आहे. या रोपांची देखभाल आणि उपजिवनक्षमता यावर मात्र पर्यावरणप्रेमींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Nashik Tree Cutting: वृक्षतोडीची आकडेवारी?
- पंचक मलनिस्सारण केंद्र - 521 वृक्ष
- चेहडी मलनिस्सारण केंद्र - 275 वृक्ष
- आगार टाकळी मलनिस्सारण केंद्र - 154 वृक्ष
- तपोवन मलनिस्सारण केंद्र - 447 वृक्ष
- वाचविण्यात आलेले वृक्ष - 458
- वृक्ष लागवड - 17680
Nashik Tree Cutting: नाशिकमध्ये होणार 15 हजार देशी वृक्षांची लागवड
दरम्यान, तपोवनात वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरण प्रेमींचे आंदोलन सुरू असताना राज्य सरकारकडून महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी 15 हजार वृक्ष लागवड केली जाणार आहे. यासाठी दक्षिण भारतातील राजमुद्री येथून झाडे आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी स्वतः राजमुद्री येथे जाऊन 15 फूट उंचीची सुमारे 15 हजार देशी झाडे लिंब, जांभूळ, आंबा, पिंपळ, वड आदींची निवड केली आहे. ठिबक सिंचन आणि जैविक खतांचा वापर करून मनपा उद्यान विभागाच्या माध्यमातून झाडाची देखभाल केली जाणार आहे. साधूग्रामच्या जागेवरील एक्झीबिशन सेंटरचे टेंडर रद्द केल्यानंतर आता वृक्ष लागवडीचा निर्णय सरकारने घेतला आहे. नाशिक शहरात आधी 15 हजार वृक्ष लागवड करणार त्यानंतरच साधूग्रामच्या उभारणीसाठी तपोवनातील झाडांना हात लावणार, त्यातील बहुतांश झाडांचे पुनर्रोपण करणार, अशी भूमिका मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केली असून कामाला सुरुवात झाली आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा























