नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक : मविआकडून संदीप गुळवे आज भरणार उमेदवारी अर्ज, महायुतीत उमेदवारीचा घोळ सुरूच
Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून संदीप गुळवे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते संदीप गुळवे (Sandeep Gulve) यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. संदीप गुळवे यांनी शिवसेना ठाकरे गटात (Shiv Sena UBT) प्रवेश करताच त्यांना महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संदीप गुळवे यांना एबी फॉर्म देखील प्रदान करण्यात आला आहे.
मविआकडून संदीप गुळवे उमेदवारी अर्ज दाखल करणार
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीसाठी (Election 2024) 26 जून रोजी मतदान होणार आहे. तर 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळताच संदीप गुळवे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघाची जागा मी जिंकून आणून आणेल, असा विश्वास व्यक्त केला. संदीप गुळवे हे आज महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
किशोर दराडेही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे हेदेखील आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. किशोर दराडे (Kishor Darade) हे महायुतीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून तिकीट मिळविण्यासाठी किशोर दराडे यांचे प्रयत्न सुरु आहेत. तर भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू राजेंद्र विखे हे दोघेही भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.
महायुतीत उमेदवारीचा घोळ सुरुच
महायुतीकडून (Mahayuti) अद्यापही उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतदेखील महायुतीत उमेदवारीचा घोळ सुरु असल्याचे चित्र आहे. आता महायुतीकडून किशोर दराडे, विवेक कोल्हे (Vivek Kolhe) की राजेंद्र विखे (Rajendra Vikhe) कोणाला उमेदवारी मिळणार? की महायुती वेगळ्या चेहऱ्याला संधी देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कोण आहेत संदीप गुळवे?
अॅड. संदिप गुळवे यांचे शिक्षण बी.ए., एल.एल.बी. पर्यंत झालेले असून नाशिक जिल्हा परिषदेचे 2012 ते 2017 पर्यंत ते सदस्य होते. महाराष्ट्रातील बलाढ्य शिक्षण संस्था म्हणून लौकिक असलेल्या मराठा विद्या प्रसारक मंडळाचे ते संचालक आहेत. नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी कामगिरी बजावली आहे. जिल्ह्यातील विविध सहकारी, शिक्षण व कृषी संघटनांशी ते निगडीत आहेत. ते काँग्रेस पक्षात असून ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
आणखी वाचा