(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Trimbakeshwer : 'यान चंद्रावर जातं, पण...', ओली बाळंतीण डोलीत तर नवजात मुल कापडात गुंडाळून दवाखान्यात आणलं!
Nashik Trimbakeshwer : सकाळी आईला डोली करून तीन ते चार किलोमीटर पायपीट करून अन् बाळाला पदरात गुंडाळून दवाखाना गाठला.
नाशिक : नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी बांधवांचा संघर्ष पाचवीला पुजलेला आहे. कालच देशाचा 76 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तर 14 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा एका गर्भवती महिलेने बाळाला जन्म दिला. यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी सकाळी आईला डोली करून अन् बाळाला पदरात गुंडाळून तीन ते चार किलोमीटर पायपीट करून दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
काल मोठ्या उत्साहात देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन (Indepedence Day) साजरा करण्यात आला. अवघा देश देशभक्तीचे गोडवे गात असताना दुसरीकडे आरोग्य सुविधेअभावी एका माऊलीला स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या रात्री घरातच प्रसूती करण्याची वेळ आली. काही दिवसांपूर्वीच इगतपुरी (Igatpuri) येथील महिलेला डोली करून दवाखान्यात नेल्याचं समोर आलं. यानंतर यंत्रणा फक्त हलल्या, त्यावर उपाययोजना झाल्याचं नाहीत. पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातीलच त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील खैरायपाली ग्रामपंचायत अंतर्गत येणारा माचीपाडा (Machipada) येथील स्वातंत्र्यदिनीच विदारक परिस्थिती समोर आली आहे. माचीपाडा ते प्राथमिक आरोग्य केंद्र तीन ते चार किलोमीटरचा रस्ता, 14 ऑगस्ट रोजी उशिरा येथील एका महिलेला प्रसूतिवेदना सुरु झाल्या, मात्र गावात रस्ता नसल्याने जाण्यायेण्याचे साधनही नव्हते, म्हणून घरीच प्रसूती झाली. तर काल सकाळी डोली करून बाळासह महिलेला दवाखान्यात आणण्यात आले.
खैरायपाली ग्रामपंचायत अंतर्गत येणारा माचीपाडा येथील सरला ज्ञानेश्वर बाम्हणे (Sarala Bramhane) या गर्भवती महिलेस 14 ऑगस्ट रोजी सायंकाळपासून प्रसूती वेदना सुरु झाल्या. गावापासून प्राथमिक आरोग्य केंद्र अवघ्या चार ते पाच किलोमीटर ठाणापाडा या गावाजवळ आहे. मात्र गावापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत येण्यास रस्ता नसल्याने त्या महिलेची रात्री 2 वाजेच्या सुमारास घरीच प्रसूती करावी लागली. अशातच दुसऱ्या दिवशी दवाखान्यात नेणं गरजेचे असल्याने सकाळी डोली करावी लागली, आईला डोली करून तर पदरात गुंडाळून दवाखान्यापर्यंत न्यावं लागले. ठाणापाडा येथील आश्रमशाळेपर्यंत गावातील तरुणांनी डोली करून आणली. या ठिकाणी रस्त्यावर आणल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राची गाडी आली, या गाडीने काही अंतरावर दवाखान्यापर्यंत नेलं.
रस्त्याअभावी रुग्णांचे हाल...
माचीपाडा ते ठाणापाडा आश्रम शाळापर्यंत 2 ते 3 कि. मी. पक्का रस्ता अद्याप नसून गावची लोकसंख्या 195 च्या आसपास आहे. माचीपाडा घरांची संख्या 27 ते 30 असुन शाळा पाचवीपर्यंत आहे. शाळेसाठी ग्रामस्थ यांनी श्रमदानातून एक खोली बांधकाम केले असुन पाचवीपर्यंत एकच शिक्षक आहे. मुली 9 मुले 9 असे एकूण 18 विद्यार्थी संख्या असुन अंगणवाडी बांधली आहे. गावात जुनी विहीर असुन जलजीवन विहीर अद्याप झालेली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे, मालकीच्या जमिनीत 4 घरे असुन बाकी महामंडळ जमीनीत आहेत, असे ग्रामस्थ सांगतात. यापूर्वी रस्त्याविना सर्प दंश झालेले पेशंट देविदास तुकाराम सापटे यांचे निधन झाले. झाडावरून पडलेला संदीप नावजी टोकरे याचे देखील वेळेवर उपचार न झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. रस्ता नसल्याने डोली शिवाय माचीपाडा ग्रामस्थ यांना पर्याय नसतो म्हणून उपचारासाठी उशीर झाल्याने पेशंट दगावण्याची शक्यता अधिक असते.
आजही आदिवासी भागातील परिस्थिती जैसे थे...
एकीकडे यान चंद्रावर जात पण रस्ते होत नाहीत, ही महाराष्ट्रातील अनेक भागातील शोकांतिका असल्याचे वेळोवेळो अधोरेखित होते. काही दिवसांपूर्वीच इगतपुरीची घटना घडली, त्या आधी जिल्ह्यातील पेठ, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अशा घटना समोर आल्या. मात्र नेहमीच झालं आहे. त्या घटनेपुरता राजकीय नेते आश्वासनांचा भडीमार करतात, मात्र नंतर परिस्थिती जैसे थे. आपण स्वातंत्र्याच्या 76 वर्षांनंतरही साध्या पायाभूत सुविधा सुद्धा नागरिकांना बहाल करू शकत नाही, हे वास्तव आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :