Nashik News : नाशिक मनपाने पाणीपट्टीतून जमा केले 44 कोटी, चारशेहून अधिक घराचं पाणी बंद
Nashik News : नाशिक मनपा कर वसुली विभागाची शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन विरोधात थेट कारवाई सुरू आहे.
Nashik News : गेल्या वर्षी मार्च अखेर 149 कोटींच्या वसुलीपर्यंत पोहोचलेल्या नाशिक (Nashik) महापालिकेच्या कर वसुली विभागाने यंदा फेब्रुवारीच्या मध्यान्हीच 150 कोटी रुपयांची कर वसुली केली असून, आर्थिक वर्षाअखेरीसाठी अजून 50 दिवस शिल्लक असल्याने आणखी सुमारे 25 कोटी रुपये वसूल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अलीकडच्या काळात ही विक्रमी वसुली मानली जात आहे.
नाशिक (Nashik NMC) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Nashik NMC) यांच्या आदेशाने कर वसुली विभागाने शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन विरोधात थेट कारवाई सुरू आहे. कोरोनामुळे (Corona) सलग दोन वर्षे कर वसुलीत मागे पडलेल्या नाशिक महापालिकेने यंदा आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी चार महिने अगोदरच घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम राबविली. वर्षानुवर्षे कर थकविणाऱ्या बड्या थकबाकीदारांची यादी तयार करण्याबरोबरच त्यांच्या घरासमोर 'ढोल बजाव' अभिनव आंदोलन हाती घेतले होते. त्याला काही थकबाकीदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला तर काहींनी टप्याटप्प्याने वसुलीला हातभार लावला. तरीही सुमारे 59 हजार मिळकतधारकांकडे सुमारे दीडशे कोटीहून अधिक थकबाकी असल्याने कर वसुली विभागाने थकबाकीदारांना नोटिसा बजावत मालमत्ता जप्त करण्याचा इशारा दिला.
नाशिक महानगरपालिकेने नोटीस बजावल्यांनंतर त्याचबरोबर नळ कनेक्शन देखील बंद करण्याचा धडाका लावल्याने थकबाकी भरण्याकडे मालमत्ताधारकांनी धाव घेतली. त्यामुळे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दीडशे कोटी रुपये पाठविण्यात आले आहे. वसूल झाले आहेत. गेल्या वर्षी 31 मार्च अखेर महापालिका जेमतेम 149 कोटी वसूल करू शकली होती. यंदा अजूनही हातात 50 दिवस शिल्लक असून कर वसुली सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले. या 50 दिवसांत सुमारे 25 कोटी रुपयांची वसुली अपेक्षित असल्याचे कर वसुली विभागातील सूत्रांनी सांगितले.
422 नळ कनेक्शन कट
घरपट्टी वसुलीप्रमाणेच थकीत पाणीपट्टी वसुलीसाठीही कर वसुली विभागाने जोरदार मोहीम हाती घेतली आहे. मोठी थकबाकी असलेले व पाणीपट्टीची रक्कम न भरणाऱ्या 412 नळ कनेक्शन कट करून त्यांचा पाणी पुरवठा रोखण्यात आला असून, आतापर्यंत 44 कोटी रुपये वसुली करण्यात आली आहे. त्यासाठी 4013 नळ धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी 3521 नलधारकांनी आपल्याकडील थकीत रक्कम अदा केली आहे.
शासकीय कार्यालयांकडे थकबाकी कायम
शहरातील विविध शासकीय कार्यालयांकडे सुमारे 21 कोटी रुपयांची कर वसुली थकीत आहे. त्यासाठी महापालिकेच्या कर वसुली विभागाने थकीत कर वसुलीसाठी त्या त्या खातेप्रमुखांना पत्र पाठवून रक्कम भरण्याची विनंती केली असली त्याला फारसा प्रतिसाद शासकीय कार्यालयांकडून मिळालेला नाही. मार्चअखेरपर्यंत भरणा करण्याची या कार्यालयांना मुदत देण्यात आली असून, मनपा आयुक्तांच्या स्वाक्षरीचे स्मरण पत्रही पाठविण्यात आले आहे.