Nashik APMC Election : नांदगाव बाजार समिती निवडणुकीत सुहास कांदेंची एकहाती सत्ता; भुजबळांना धक्का
Nashik APMC Election : नांदगाव बाजार समिती निवडणुकीत आमदार सुहास कांदे गटाने 15 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे.
Nashik APMC Election : नांदगाव कृषी उत्पन्न बाजार (Nandgaon Bajar Samiti) समितीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) आणि ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनलने 15 पैकी 15 जागांवर विजय संपादन करत परिवर्तन पॅनलला धोबीपछाड दिली. परिवर्तन पॅनलला दोन जागांवर समाधान मानावे लागले असून हमाल मापारी गटात अपक्षाने बाजी मारली आहे.
नांदगाव बाजार समितीसाठी (Nashik APMC Election) गेल्या शुक्रवारी मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यात 1666 पैकी 1641 मतदारांनी मतदान हक्क बजावला होता. त्यानंतर काल उशिरापर्यंत या बाजार समितीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. समितीसाठी आमदार सुहास कांदे व बापूसाहेब कवडे यांच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनलविरोधात माजी आमदार पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal), अॅड. अनिल आहेर, जगन्नाथ धात्रक, संजय पवार, राजेंद्र देशमुख यांनी मोट बांधत आव्हान दिले होते. कांदे यांच्या विरोधात पाच माजी आमदारांनी आघाडी केल्याने आव्हान उभे ठाकले होते. परंतु कांदे व कवडे यांच्या पॅनलने 15 जागा जिंकत विरोधी आघाडीला झटका दिला. व्यापारी गटात दोन उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. त्यात कांदे गटाच्या उमेदवाराने बाजी मारली. याठिकाणी पंकज भुजबळांना कांदे यांनी धक्का दिला आहे.
असे आहेत विजयी उमेदवार
अखेर रात्री दहा वाजता निकाल घोषित करण्यात आला. त्यानुसार सोसायटी सर्वसाधारण गटातून एकनाथ सदगीर, कैलास पाटील, समाधान पाटील, दर्शन आहेर, साहेबराव पगार, जीवन गरुड, सतीश बोरसे तर महिला राखीव गटातून मंगला काकळीज, अलका कवडे, इतर मागासवर्ग गटात अमित बोरसे, विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून पोपट सानप, ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून अनिल वाघ, अर्जुन पाटील आर्थिक दुर्बल गटातून दीपक मोरे तर अनुसूचित जमाती गटात अनिल सोनवणे, तर व्यापारी गटात यज्ञेश कलंत्री, अमोल नावंदर तर हमाल मापारी गटात अपक्ष निलेश इप्पर हे विजयी घोषित करण्यात आले.
उमेदवाराचा चिठ्ठीद्वारे मिळाला कौल
नांदगाव बाजार समितीच्या व्यापारी गटातील दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी पॅनलचे अमोल नावंदर यांना 195 आणि गोकुळ कोठारी यांना 195 अशी सारखीच मते मिळाली. यावेळी चिठ्ठीद्वारे हा निकाल घोषित करण्यात आला. स्वरूप ज्ञानेश्वर बाहीकर या सहा वर्षे वयाच्या मुलाच्या हस्ते चिट्ठी काढण्यात आली. त्यात अमोल नावंदर यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. तर आज मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला सकाळी अकरा वाजेल प्रारंभ होणार आहे