Nashik News : छगन भुजबळांची विसर्जन स्थळांवर पाहणी, गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्याचे आवाहन
Ganesh Chaturthi : गणेशोत्सव कालावधीत काढण्यात येणाऱ्या मिरवणूक मार्गावरील रस्त्यांचे खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे. अहिल्याबाई होळकर घाट व इतर विसर्जनस्थळी साफसफाईची कामे लवकरात लवकर पार पाडण्याच्या सूचना
नाशिक : दोन दिवसांत गणेशोत्सवात (Ganeshotsav 2022) सुरुवात होणार असून हा गणेश उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागानी सामूहिक नियोजन करावे अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिला. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थित गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज येवला संपर्क कार्यालय येथे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थित गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज येवला संपर्क कार्यालय येथे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, गणेशोत्सव कालावधीत काढण्यात येणाऱ्या मिरवणूक मार्गावरील रस्त्यांचे खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे. अहिल्याबाई होळकर घाट व इतर विसर्जनस्थळी साफसफाईची तसेच लाईटची, साऊंड सिस्टीमची कामे करण्यात यावी. याठिकाणी कुठलीही दुर्घटना होणार नाही. यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा तसेच पूर्णवेळ लाईफ सेव्हींग गार्डची नेमणूक करण्यात येऊन कुठलाही अपघात न होता हा उत्सव निर्विघ्न पार कसा पडेल त्यादृष्टीने नियोजन करण्यात याव्यात अशा सूचना त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा
येवला तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातील नुकसानग्रस्त भागातील काही ठिकाणी अद्यापही पंचनामे झालेले नाही अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे. या तक्रारींची तातडीने दखल घेऊन नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात यावे. तसेच नुकसानग्रस्त कुणीही व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात यावी अशा सूचना छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
अहिल्यादेवी घाटाची पाहणी
बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी येवल्यातील अहिल्यादेवी होळकर घाटाची पाहणी केली. गणेशोत्सवात येवला शहरातील घरगुती व मंडळांच्या गणपती मूर्तींचे विसर्जन अहिल्यादेवी होळकर घाट येथे करण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी घाटावर प्रत्यक्षात पाहणी केली. यावेळी याठिकाणी स्वच्छता, सुशोभीकरण,लाईटची व्यवस्था ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.
लवकरच सोळा गाव पाणी योजनेचा शुभारंभ
लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणी पुरवठा योजनेच्या कामास आठवडाभरात कार्यारंभ आदेश प्राप्त होणार आहे. नूतनीकरणाच्या कामास तातडीने सुरुवात करण्यात यावी अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच कुठल्याही परिस्थितीत योजनेचा वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.