(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Leopard : 16 पिंजरे, 25 ट्रॅप कॅमेरे, तरीही हुलकावणी, नाशिकमध्ये पहिल्यांदा बिबट्याच्या शूट आऊटची मागणी
Nashik Leopard : त्र्यंबक परिसरातील बिबट्या (Leopard) अद्यापही जेरबंद होत नसल्यानं ठार मारण्याची परवानगी देण्याची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे करण्यात आली.
Nashik Leopard : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात वन विभागाचे कर्मचारी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून तळ ठोकून आहेत. 16 पिंजरे, 25 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून बिबट्याचे शोधकार्य सुरु आहे. मात्र बिबट्या (Leopard) अद्यापही जेरबंद होत नसल्यानं बिबट्याला ठार मारण्याची परवानगी देण्याची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे करण्यात आली. नाशिकमधून पहिल्यांदाच अशा पद्धतीची मागणी होत असल्याचे चित्र आहे.
एखाद्या युद्धभूमीवर लष्कराचे जवान जसे सज्ज असतात, तशीच सज्जता सध्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील पिंपळद (Pimplad), बाह्मणवाडे, शिरसगाव, धुमोडी, गणेशगाव, तळवाडे (Talwade) या गावामध्ये बघायला मिळत आहे. वन विभागाचे अधिकारी कर्मचारी अशी 25 ते 30 जणांची टीम गेल्या आठ दिवसांपासून डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याचा शोध घेतला जात असून अद्यापही बिबट्याचा ठाव ठिकाणा लागत नाही. गावात भीतीचे वातावरण आहे. सायंकाळी पाचनंतर घराबाहेर जायला ही कोणी धजावत नाही. एकटा-दुकटा कोणी जात असेल तर तोही जीव मुठीत घेऊनच जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्याला कारण ठरलंय बिबट्याची दहशत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याची दहशत वाढली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 6 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता देविका सकाळे तिच्या मोठ्या बहिणीसोबत घरी जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप मारली. तिला दूर जंगलात नेऊन ठार केले. तेवढ्यात तिचे वडील आणि इतर कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या बहिणीने दगड मारून बिबट्याला पळवून लावले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. बिबट्याच्या हल्यात चिमुरडीचा जीव गेला. या प्रसंगातून अद्यापही सकाळे कुटुंबीय सावरलेले नाही. आजही त्यांना मुलीच्या आठवणी आणि बिबट्याची दशहत पदोपदी जाणवत असून त्यांचे अनुभव काळजाचा ठोका चुकविणारे आहेत. त्यामुळे बिबट्याला ठार मारा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
केवळ ही एकच घटना नाही तर डिसेंबरपासून आतापर्यंत तीन बालकांचा बालकांचे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. बाजूलाच असणाऱ्या ब्राह्मणवाडे गावात 15 मार्च रोजी 3 वर्षाच्या बालिकेलावर बिबट्याने हल्ला करून ठार मारले. 24 डिसेंबर रोजी सुरेश दिवटे या बालकाला तर धुमोडी गावातुन जुलै महिन्यात 7 वर्षीय मुलीला बिबट्याने ठार केले होते. वारंवार बिबट हल्ल्याच्या घटना घडत आहे. नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्या बरोबरच गस्त घालत आहेत. कोणी बंदुकीच्या दुर्बिणीतुन बिबट्याचा शोध घेतंय तर कोणी ड्रोनच्या माध्यमातून हवाई पाहणी करत सर्च ऑपरेशन राबवित आहेत. मात्र तरीही बिबट्या हाती लागत नसल्यानं बिबट्याला ठार मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नाशिकच्या वनाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे केली आहे.
पिंपळद शिवारात 25 ट्रॅप कॅमेरे
सध्या बिबट्या ज्या भागात दर्शन देत असून त्याठिकाणापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आठ ते दहा गाव असून हजारो नागरिक राहत आहेत. यामुळे परिसरात 16 पिंजरे, 25 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. वन विभागाचे 4 पथक झाडाझुडपात जाऊन बिबट्याचा शोध घेत आहेत. वन अधिकारी कर्मचारी 6 एप्रिलपासून इथे तळ ठोकून आहेत. इथेच त्यांनी आपला तंबू टाकला आहे. बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी एक्स कॅलिबर, न्यू डार्ट टेली इंजेक्ट या बंदुका, ब्लो पाईप सज्ज आहे, तर स्वरक्षणासाठी SLR 9 MM गन ही ठेवण्यात आली आहे.
बिबट्याला शूट आऊट करण्याची मागणी
नाशिक ही बिबट्याची नागरी म्हणून ओळखली जाते. दर एक दोन दिवसात जिल्ह्यात कुठे ना कुठे बिबट्या दर्शन देतो. तर कुठेतरी गाय, वासरू, कुत्रा, जनावरे यांचा फडशा पडल्याच्या घटना घटना घडत असतात. यानंतर प्रशासन घटनास्थळी जाऊन पाहणी करून पिंजरे लावून बिबट्यांना पिंजऱ्यात कैदही करण्यात येते. मात्र सद्यस्थितीत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद, धुमोडी, वेळुंजे परिसरात घडलेल्या घटनांमुळे नागरिक संतप्त असून बिबट्याला शूट आउट करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवाय स्थानिक अधिकाऱ्यांनी देखील वरिष्ठांकडे याबाबत परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आल्यानं बिबट्याच्या दशहतीची गंभीरता लक्षात येत आहे. त्यामुळे सरकार काय निर्णय घेते, याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलं आहे.