Nashik News : अंगावर कपाट पडल्याने तीन वर्षीय बालकाचा मृत्यू, नाशिकच्या सिडको परिसरातील हृदय हेलावणारी घटना
Nashik News : अंगावर कपाट पडल्याने तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. शौर्य सुजित विश्वकर्मा असं मृत चिमुकल्याचं नाव आहे. जाधव संकुलमध्ये बुधवारी (26 एप्रिल) ही हृदय हेलावणारी दुर्दैवी घटना घडली.
Nashik News : नाशिकच्या सिडको (CIDCO) परिसरात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे आहे. अंगावर कपाट (Cupboard) पडल्याने तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. शौर्य सुजित विश्वकर्मा असं मृत चिमुकल्याचं नाव आहे. जाधव संकुलमध्ये बुधवारी (26 एप्रिल) ही हृदय हेलावणारी दुर्दैवी घटना घडली.
लाकडी कपाटाजवळ झोपी गेला अन्
शौर्य सुजित विश्वकर्मा हा चिमुकला काल सकाळी घरातील लाकडी कपाटाजवळ झोपी गेला होता. याच वेळी अचानक शेजारी असलेले लाकडी कपाट त्याच्या अंगावर पडले. झोपेत तसंच बेसावध असलेल्या चिमुकल्या शौर्यला काहीच हालचाल करता आली नाही. त्याला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तपासून सुजितला मृत घोषित केले. या घटनेमुळे विश्वकर्मा कुटुंबासह परिसरावर शोककळा पसरली असून या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे. घटना अतिशय दुर्दैवी होती. अशाप्रकारच्या घटना पुन्हा न घडण्यासाठी आपल्या पाल्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पालकांनी आपल्या पाल्यांकडे ते खेळत असताना किंवा झोपलेले असताना लक्ष ठेवण्याची गरज आहे. सावध असल्यास अशाप्रकारच्या दुर्दैवी घटना घडणार नाही त्यामुळे पालकांनी दक्षता घेणं गरजेचं असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
दुभाजकाला गाडी धडकून अपघात, तीन वर्षीय बालकाचा मृत्यू
22 एप्रिल रोजी दुभाजकाला गाडी धडकून झालेल्या अपघातात तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. सटाणा शहरातील सामाजिक कार्यकर्ते मिथून उर्फ पप्पू डोंगरे यांनी आपल्या परिवारासह अक्षय्य तृतीया सण साजरा केल्यानंतर ते आई, पत्नी, दोन्ही मुलांसह चारचाकीने बहिणीकडे पुण्याला निघाले होते. या दरम्यान सिन्नर-संगमनेरजवळ आले असता दुभाजकाला गाडी धडकली. यात चारचाकी वाहन अनेकदा उलटले. यात डोंगरे कुटुंबातील तीन वर्षीय श्रीयांशचा मृत्यू झाला. तर आईच्या कमरेला जबर मार बसला असून पत्नीच्या एका हाताला गंभीर दुखापत झाली. तसेच पप्पू डोंगरे आणि त्यांचा मोठा मुलगा किरकोळ जखमी आहेत. श्रीयांशवर मोठ्या शोकाकुल वातावरणात सटाणा येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली.
खेळता खेळता आठ महिन्यांच्या बाळाने नेलकटर गिळलं
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात नाशिकरोड परिसरात आठ महिन्याच्या बाळाने चक्क नेलकटर गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आठ महिन्याच्या मुलाने खेळता खेळता बेबी नेलकटर गिळलं. मुलाने नेलकटर गिळल्याचे लक्षात येताच पालकांनी त्याला आडगावच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केलं. डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करत नेलकटर बाहेर काढलं.