(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Accident : सटाण्यातील कुटुंबाच्या कारचा अपघात, आईवडिलांच्या डोळ्यांदेखत तीन वर्षीय श्रीयांशचा मृत्यू
Nashik Accident : सटाणा शहरातील डोंगरे परिवाराच्या कारचा भीषण अपघात होऊन बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
Nashik Accident : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अनेक भागातील महामार्ग सध्या अपघाताचे (Accident) केंद्र बनत चालले आहेत. रोजच घडणाऱ्या अपघाताच्या घटनांनी वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच सटाणा शहरातून अक्षय्यतृतीयेचा सण साजरा करुन पुणे येथे बहिणीकडे घरभरणीसाठी जाणाऱ्या डोंगरे परिवाराच्या कारचा सिन्नर-संगमनेर दरम्यान भीषण अपघात होऊन तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
रमजान ईद (Ramzan Eid) आणि अक्षय्य तृतीया हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने नाशिकसह जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र या दिवशी अनेक भागात अनुचित घटना घडल्याचे निदर्शनास आले. यात दोन पिता पुत्रांचा अपघाती मृत्यू तर नाशिक शहरात एकजण धरणात बुडाल्याचे समोर आले होते. आता सटाणा (Satana) शहरातील अपघाताची घटना समोर आली आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्या परिवारासह सण साजरा केला. त्यानंतर बहिणीला भेटण्यासाठी परिवारासह एका चारचाकी वाहनातून निघाले, मात्र वाटेत नियतीने घात केला आणि आईवडिलांच्या डोळ्यांदेखत कोवळ्या श्रीयांशचा मृत्यू झाला. तर डोंगरे यांची पत्नी, आई, मुलगा जखमी असून, चालकासही दुखापत झाली आहे.
सटाणा शहरातील सामाजिक कार्यकर्ते मिथून उर्फ पप्पू डोंगरे यांनी आपल्या परिवारासह अक्षय्य तृतीया सण साजरा केला. त्यानंतर ते शनिवारी आई, पत्नी, दोन्ही मुलांसह बहिणीकडे पुण्याला निघाले. यासाठी चारचाकीतून वाहनातून सगळा परिवार पुण्याला निघाला. त्यासाठी ते सिन्नर संगमनेर मार्गे जाण्याचे ठरले. त्यानुसार ते सटाणा शहरातून बाहेर पडले. दरम्यान सिन्नर-संगमनेरजवळ (Sinnar Sangamner Highway) आले असता दुभाजकाला गाडी धडकली. यात चारचाकी वाहन अनेकदा उलटले. यात डोंगरे कुटुंबातील तीन वर्षीय बालक श्रीयांश याचा मृत्यू झाला. तर आईच्या कमरेला जबर मार बसला असून पत्नीच्या एका हाताला गंभीर दुखापत झाली. तसेच पप्पू डोंगरे आणि त्यांचा मोठा मुलगा किरकोळ जखमी आहेत. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी डोंगरे कुटुंबियांना संगमनेर येथे उपचारासाठी दाखल केले. तिथून अपघातात जखमी झालेल्या डोंगरे परिवाराला नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर श्रीयांशवर मोठ्या शोकाकुल वातावरणात सटाणा येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील हे मार्ग अपघाताचे केंद्र....
नाशिक शहरासह जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून नाशिक-मुंबई आग्रा महामार्ग, नाशिक- शिर्डी महामार्ग, सिन्नर घोटी महामार्ग नाशिक-पेठ महामार्ग या महामार्गांवर सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. या महामार्गावर अलीकडे वाहनांची संख्या देखील वाढली असून वाहतूक दिवस रात्र सुरु असते. अशावेळी टायर फुटणे, पाठीमागील वाहनांची धडक बसणे, डिव्हायडरवर वाहन चढणे आदी अपघाताचे प्रकार पाहायला मिळत आहेत. त्यातच सिन्नर संगमनेर महामार्ग देखील लक्षणीय वाहतूक सुरु असते. त्यामुळे या महामार्गावर देखील अपघातात होत असल्याचे दिसून येते.