Nashik Demolition Action : नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या ऑफिसवर कारवाई, गितेंच्या संपर्क कार्यालयावर पालिकेने चालवला JCB
Municipality Action on Shiv Sena Office : नाशिक महापालिकेच्या आदेशानंतर अतिक्रमण विभागाने शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयावर तोडक कारवाई केली आहे.
नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Camp) नाशिकमधील (Nashik) कार्यालयावर महानगरपालिकेने कारवाई केली आहे. महापालिकेच्या (Nashik Palika) आदेशानंतर अतिक्रमण विभागाने शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयावर तोडक कारवाई केली आहे. मनपाची जागा नसताना कारवाई कशी केली? असा सवाल ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या ऑफिसवर कारवाई
नाशिकमधील माजी शिवसेना आमदार वसंत गिते यांच्या संपर्क कार्यालयावर पालिकेकडून जेसीबी चालवण्यात आला आहे. माजी आमदार वसंत गिते यांच्या मुंबई नाका परिसरातील संपर्क कार्यालयाचे अतिक्रमण हटवण्यात आलं आहे. यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मनपा अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली आहे.
गितेंच्या संपर्क कार्यालयावर पालिकेने चालवला बुलडोझर
वसंत गिते यांच्या कार्यालयात शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे घेऊन कार्यकर्ते उभे होते. या ठिकाणी सुमारे 40 वर्षांपासून संपर्क कार्यालय होतं. हे प्रकरण सध्या नायप्रविष्ट असतानादेखील पालिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. संपर्क कार्यालयाच्या बाजूला असणारी लहान-मोठी दुकानेही हटवण्यात आली आहे.
मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात
माजी आमदार वसंत गिते यांच्या मंबई नाका परिसरातील संपर्क कार्यालयाचे अतिक्रमण हटविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रकरण न्याय प्रविष्ठ असताना अतिक्रमण आहे हे मनपा कसे ठरविणार, असा सवाल यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. न्याय प्रविष्ठ प्रकरण असताना कारवाई कशी होऊ शकते, असा सवाल माजी उपमहापौर आणि वसंत गिते यांचे पुत्र प्रथमेश गीते यांनी मनपा अधिकाऱ्यांना विचारला. मात्र, अखेरील मनपाकडून तोडक कारवाई करण्यात आली आहे.
गिते समर्थकांचा कारवाईला विरोध
तोडक कारवाई होणार की नाही, यावर काही काळ चर्चा सुरू, कारवाई करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे ऑर्डर नसल्यानं गिते समर्थकांचा कारवाईला विरोध केला होता. माजी आमदार वसंत गिते, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर घटनास्थळी दाखल झाले होते.
'या कारवाईला आम्ही त्याला न्यायालयात आव्हान देणार'
माजी आमदार वसंत गिते यांनी मनपाच्या तोडक कारवाईवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, राजकीय हेतूने चुकीची कारवाई होत आहे. नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे या सुडाचं राजकारण करत आहेत. एसटी महामंडळाच्या आवारात आमचे कार्यालय आहे. 50 वर्षांपासून आम्ही इथे काम करतोय. महामंडळाला अडचण नसताना, मनपा सुमोटो कारवाई का करत आहे. या कारवाईला आम्ही त्याला न्यायालयात आव्हान देऊ, असंही अनंत गिते यांनी सांगितलं आहे.