(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : ड्रग्जप्रश्नी रस्त्यावर उतरू, मंत्र्यांच्या गाड्या अडवू, वेळ पडली तर नाशिक बंद करु, खासदार संजय राऊत यांचा इशारा
Nashik Sanjay Raut : नाशिकमध्ये ड्रग्जमाफियांमुळे अनेक घरे उध्वस्त होत आहेत, याला जबाबदार कोण? असं प्रश्न संजय राऊत यांनी केला.
नाशिक : नाशिक हा ड्रग्ज माफिया (Drug) आणि गुन्हेगारांचा अड्डा बनला असून धार्मिक सांस्कृतिक अशी ओळख असलेल्या नाशिकला शोभनीय नाही. त्यामुळे नाशिक शहर, तरुण पिढी उध्वस्त होणार असेल तर शिवसेना रस्त्यावर उतरेल, वेळ आली तर मंत्र्यांच्या गाड्या अडवू, नाशिक (Nashik) बंद करू अशा इशारा संजय राऊत यांनी दिला. येत्या 20 ऑक्टोबरला विराट मोर्चाचे (Morcha) आयोजन करण्यात आले असून यात नाशिककरांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज संजय राऊत (Sanjay Raut) नाशिक दौऱ्यावर असून कालच त्यांनी नाशिक ड्रग्ज प्रकरणावर आपली भूमिका मांडली. त्यानंतर आज देखील माध्यमाशी संवाद साधत स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार, पालकमंत्र्यांना धारेवर धरले आहे. संजय राऊत म्हणाले की, काही दिवसांपासून नाशिक हे महाराष्ट्रात वेगळ्या अर्थाने चर्चेत आल आहे. नाशिक हे संस्कारी आणि सभ्य लोकांचे शहर असून तिर्थ क्षेत्र आहे. मात्र मागील सात आठ महिन्यांपासून ज्यासाठी शहर गाजतय हे संस्कृतीला शोभणार नाही. वर्षभरापासून नाशिक ड्रग्ज माफियांचा आणि गुन्हेगारांचा (Crime) अड्डा बनला आहे. त्यामुळे यांच्याविरोधात आवाज उठवणे प्रत्यके नाशिककरांची जबाबदारी असून यासाठी शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरणार असून येत्या 20 ऑक्टोबरला विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगत सर्व नाशिककरांनी, पालकांनी या मोर्चात सहभागी होत निषेध नोंदवावा असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत यावेळी म्हणाले की, नाशिकमधील शाळा, कॉलेज अनेक शैक्षणिक संस्थांना ड्रग्जचा विळखा बसला आहे. यामुळे पालक अस्वस्थ आहेत. ड्रग्जच्या आहारी गेल्यामुळे अनेक मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. 75 टक्के मुलांनी अमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे आत्महत्या केल्या असल्याचे समोर आले आहे. मागील 6 महिन्यात 20 ते 35 वयोगटातील तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या पोस्टमार्टेममधून अमली पदार्थ सेवनाने आत्महत्या केल्याचं सिद्ध झाल्याचे देखील राऊत म्हणाले. तसेच शहरासह जिल्ह्यात रौलेट जुगार, कुत्ता गोलीचा वापर केला जातो आहे. घरदार, शेती विकून तरुण ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहेत. त्यातच नाशिकरोडजवळ कोट्यवधीचा कारखाना उध्वस्त करण्यात आला आहे. नशा आणि ऑनलाईन गेममुळे किती लोकांनी आत्महत्या केल्या? याला जबाबदार कोण? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
मंत्र्यांच्या गाड्या अडवू, वेळ पडली तर नाशिक बंद करु
तसेच नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारी आणि ड्रग्जमाफियांमुळे अनेक घरे उध्वस्त होत आहेत. याला जबाबदार कोण? असे सांगत सध्याचे पालकमंत्री आणि ज्यांना पालकमंत्री व्हायच आहे ते, या नाशिकच्या अधोगतीला जबाबदार आहेत. त्यामुळे नाशिक आणि येथील तरुणपिढी बरबाद होत असेल तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही, यासाठी मोठं आंदोलन उभं राहील. याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली असून 20 तारखेला शिवसेनेचा विराट मोर्चा निघेल. हा आमचा इशारा मोर्चा असून या प्रश्नावर मंत्र्यांच्या गाड्या अडवू, वेळ पडली तर नाशिक बंद करु असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. तसेच या मोर्चात शहरातील जिल्ह्यातील नागरिकांनी, पालकांनी या मोर्चात सहभागी होऊन निषेध नोंदवावा असे आवाहन राऊत यांनी यावेळी केले.
इतर महत्वाची बातमी :