Lalit Patil : 'मुलं असं काही करतील, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, अशी मुलं गेलेली बरी', ललित पाटीलच्या आई-वडिलांना अश्रू अनावर
Nashik Drug Case : 'आम्हाला काही त्रास होईल, असं काही पोलिसांनी करू नये', असं भावनिक आवाहन ललित पाटीलच्या (Lalit Patil) आई वडिलांनी केलं.
नाशिक : 'आमची दोन्ही मुलं असं काही करतील, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. कारण गेल्या तीन वर्षांपासून ललित तुरुंगात आहे. या तीन वर्षात आम्ही कधी भेटलोही नाही, एक प्रकारे आम्ही त्याला सोडूनच दिलेलं होतं, अशी मुलं गेलेली बरी, अस सांगत पोलिसांनी कारवाई करा, मात्र आम्हाला काही त्रास होईल, असं काही पोलिसांनी करू नये, अन्यथा आमचे नातू रस्त्यावर येतील असं भावनिक आवाहन ललित पाटीलच्या (Lalit Patil) आईवडिलांनी यावेळी केलं.
तब्बल पंधरा दिवसांपासून फरार आरोपी ललित पाटीलला चेन्नईत (Chennai) अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच भूषण पाटीलला (Bhushan Patil) देखील अटक करण्यात आली. यानंतर आज पहाटेच्या सुमारास ललित पाटीलला देखील अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या अटकेनंतर ललित पाटीलचे कुटुंबीय यांनी एबीपी माझाशी प्रतिक्रिया दिली. अटक झाल्याचे पहिल्यांदाच कळत आहे. ललित पाटीलच्या आई म्हणाल्या की, त्याच्याशी पोलिसांनी बोलावं, चर्चा करावी, त्याचे एन्काऊंटर करू नये, हीच आमची इच्छा आहे. उतार वयात असा मनस्ताप होत आहे, आम्ही फार त्रासातून जात आहोत, अजून आम्हाला त्रास देऊ नये, अशा स्थितीत आम्हाला काही झालं, तर आमचे नातू रस्त्यावर येतील, अस सांगत ललित पाटीलचे वडील भावूक झाले.
ललित पाटीलचे वडील म्हणाले की, 'आमची मनस्थितीच नाही, आज काहीही एक बोलण्याची, जेव्हा भूषण पाटील अटक झाली, तेव्हा पोलिसांनी चौकशीत विचारलं की, पासपोर्ट, बँक पासबुक आदी गोष्टी विचारण्यात येत होत्या. त्यावेळी मात्र आम्हाला याबाबत कुठलीही माहिती नसल्याचा पोलिसांना सांगितलं होतं, जेव्हा काही माहिती मिळेल, तेव्हा आम्ही नक्की सहकार्य करू, असेही त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा चौकशीसाठी येऊन सर्व कागदपत्र घेऊन गेले आहेत. आता आमच्याकडे काही शिल्लक राहिलेले नाही. भूषण पाटीलला जेव्हा आणलं होतं, तेव्हा आम्हाला देखील भेटू दिलं नाही. ललित पाटीलच्या आई म्हणाल्या की, तो गेल्या तीन वर्षांपासून तुरुंगात होता. त्यामुळे आमचा काहीच संपर्क येत नव्हता. त्यामुळे त्यांनी हे ड्रग्ज रॅकेट कधी सुरू केलं, याबद्दल काहीच माहिती नाही जर आम्हाला याबाबत माहिती असती तर आम्ही नक्कीच त्याला सांगितलं असतं की हे चुकीचं आहे, हे करू नको, मात्र आम्हाला एक दीड वर्षात काय चाललंय, याबाबत कल्पनाच नव्हती, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
आई-वडील झाले भावूक
यावेळी त्या म्हणाल्या की, आम्हाला असंही कळालं, त्याचं एन्काऊंटर करणार आहेत. पण असं करू नका. तर सद्यस्थितीत पोलिसांकडून जी कारवाई सुरू आहे. यावर ललित पाटीलचे वडील म्हणाले की, योग्य कारवाई सुरू आहे. आमचं काहीच म्हणणं नाही. पोलिसांची कारवाई आम्हाला मान्य आहे. आमची दोन्ही मुलं असं काही करतील, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. कारण गेल्या तीन वर्षांपासून तो तुरुंगात आहे. या तीन वर्षात आम्ही कधी भेटलो ही नाही, एक प्रकारे आम्ही त्याला सोडूनच दिलेलं होतं, अशी मुलं गेलेली बरी, अस सांगताना ललित पाटीलच्या वडिलांना रडू कोसळलं. ते पुढे म्हणाले की, उतार वयात असा मनस्ताप होत असेल, अशा स्थितीत आम्हाला काही झालं, तर आमचे नातू रस्त्यावर येतील, अस सांगत ललित पाटीलचे वडील भाऊक झाले. पोलिसांची कारवाई योग्य आहे, मात्र आम्हाला काही त्रास होईल, असं काही पोलिसांनी करू नये, ललित पाटीलच्या वडिलांनी सांगितलं, कारण आम्ही फार त्रासातून जात आहोत, अजून आम्हाला त्रास देऊ नये, असंही ते म्हणाले.
इतर महत्वाची बातमी :
Lalit Patil : नव्या नंबरवरून फोन केला, तिथेच फसला, मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला नेमकं कसं पकडलं?