(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : फुले-शाहू-आंबेडकर यांना पुजले पाहिजे, मात्र सरस्वतीचा अवमान करणे योग्य नाही, दादा भुसेंचे स्पष्टीकरण
Nashik News : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरस्वती पूजनावर केलेल्या अप्रत्यक्ष वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
नाशिक : फुले-शाहू-आंबेडकर यांना पुजलंच पाहिजे. मात्र यात माता सरस्वतीचा (Sarswati Devi) अवमान करणे बरोबर नाही. भारत देश हा हिंदू दैवताना मान्य करणारा असून कुणाच्या भावनांना ठेच लागेल असं बोलू नये, असा सल्ला पालकमंत्री दादा भुसे (dada Bhuse) यांनी दिला आहे. काही महिन्यांपूर्वी छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावरून चांगलाच वाद रंगला होता. आता पुन्हा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरस्वती पूजनावर केलेल्या अप्रत्यक्ष वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
नाशिक (Nashik) शहरातील मखमलाबाद परिसरातील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या शैक्षणिक संकुलात आयोजित समाजदिन (Samaj Din) सोहळ्याला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी ते म्हणाले की, ज्यांचे आपण फोटो लावतो, त्यांनी किती शाळा केल्या, त्यांनी सर्वांना का नाही शिकवलं? आपण आपले देव ओळखायला शिका, असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर पालकमंत्री भुसे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले आहे. भुसे म्हणाले की, फुले-शाहू-आंबेडकर (Fule Shahu Ambedkar) यांना पुजलंच पाहिजे. मात्र यात माता सरस्वतीचा अवमान करणे बरोबर नाही. भारत देश हा हिंदू दैवताना मान्य करणारा असून कुणाच्या भावनांना ठेच लागेल असं बोलू नये, असा सूचक विधान केले.
पालकमंत्री भुसे यांनी यावेळी अनेक विषयांवर उत्तरे दिली. यात विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवर यांनी सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री पदाची खुर्ची बदलणार असल्याचे विधान केले. यावर भुसे म्हणाले की, स्वप्न पाहण्याचा सर्वांना अधिकार असून शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकारवर जनता खुश आहे. मात्र जनतेच लक्ष विचलित करण्यासाठी असे वक्तव्य केले जात असल्याचे सांगत त्यांच्या मुख्य खुर्चीत बदल होऊ शकतो का? असा प्रश्न भुसे यांनी उपस्थित केला. तर सामनाच्या अग्रलेखावर ते म्हणाले की, सामनातून रोज कोणा कोणाला वैयक्तिक पातळीवर खालच्या स्तरावर टीका केली जात आहे. देशात प्रत्येकाला मत मांडण्याचे अधिकार आहे, मात्र त्याचा वापर कसा केला पाहिजे, याचे चिंतन त्यांनी केले पाहिजे, असा सूचक सल्लाही भुसे यांनी दिला आहे.
विविध मार्गांवर खड्डे बुजवण्याचे काम सुरू
दरम्यान नाशिकसह राज्यातील बहुतांश मार्गावर खड्ड्यांचे प्रमाण वाढत असून यावर भुसे म्हणाले की, मुंबई महामार्ग, भिवंडी बायपास आता किती वेळ लागतो हा बघा, आता रस्ता दुरुस्ती नियोजन केले असून अशा मार्गावरील हेवी ट्राफिकबाबत नियोजन केले आहे. त्यानुसार साधारण 22 किमी रस्त्यावर 24 ठिकाणी कट बंद केले आहेत. पोलिसांना सहकार्य करण्यासाठी पोलीस मित्र स्टाफ कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच नाशिक शहरातील रस्ता दुरुस्तीबाबत पाहणी केली असून मनपा अधिकाऱ्यांना खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यास सांगितले आहे. काही राहिले असेल तर दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत असेही ते म्हणाले. तसेच नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर भुसे म्हणाले की, कोणत्याही गुन्हेगारीचे समर्थन होऊ शकत नाही. अंबडच्या घटनेत दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे समजते. सद्यस्थितीत नाशिक पोलिसांकडून तोडफोड प्रकरणी मोक्का लावने निश्चित करण्यात आले आहे. महिलांच्याबाबत दामिनी पथक तयार करण्यात आले असून तात्काळ कारवाईसाठी आता पोलिसांना मोटार सायकल वाटप करण्यात आल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लक्ष ठेऊन असल्याचे भुसे म्हणाले.
काय म्हणाले भुजबळ?
नाशिक शहरातील मखमलाबाद परिसरातील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या शैक्षणिक संकुलात आयोजित समाजदिन सोहळ्याला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी ते बोलत होते. 'आम्ही कुठेही गेलो तरी शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सोडणार नाही. संभाजी भिडेंचे खरे नाव मनोहर कुलकर्णी असून ब्राह्मण समाजात कोणीही शिवाजी, संभाजी नाव ठेवत नाही असं भुजबळांनी म्हंटल. यासोबतच ज्यांचे आपण फोटो लावतो, त्यांनी किती शाळा केल्या, त्यांनी सर्वांना का नाही शिकवलं? आपण आपले देव ओळखायला शिका, अस म्हणत पुन्हा सरस्वती देवीवरून भुजबळांनी अप्रत्यक्षपणे टिका केली आहे.