Nashik News : सलमान खानच्या चाहत्यांची मस्ती उतरवली, थेट मालकानेच केली तक्रार; मालेगावच्या थिएटरमध्ये काय घडलं?
Nashik News : नाशिकच्या (Nashik) मालेगाव शहरात भाईजानच्या शो दरम्यान भरगच्च थिएटरमध्ये फटाके फोडले.
नाशिक : मालेगाव (Malegaon) शहरातील सिनेमागृहात अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) चित्रपट सुरू असताना हुल्लडबाज चाहत्यांनी भरगच्च असलेल्या थिएटरमध्ये फटाके फोडले. या प्रकरणी थिएटर मालकाने पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. यानंतर छावणी पोलीस ठाण्यात (Malegaon Police) संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल सायंकाळी शहरातील मोहन सिनेमागृहात फटाके फोडल्याचा प्रकार समोर आला होता.
अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif ) यांचा टायगर-3 (Tiger 3) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट 12 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. देशभरात सलमान खानचे चाहते असल्याने चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. याच चाहत्यांनी नाशिकच्या (Nashik) मालेगाव शहरात सुरु असलेल्या शो दरम्यान भरगच्च थिएटरमध्ये फटाके फोडले. पाहुणा कलाकार म्हणून असलेल्या अभिनेता शाहरुख खानची एंट्री होताच सर्वानीच एकच कल्ला केला. धडाधड फटाके फुटू लागले. मात्र हे प्रकरण चांगलंच अंगलट आलं असून मालकाने थेट पोलिसात तक्रार केली. या तक्रारीनुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान टायगर थ्री (Tiger 3) चित्रपट सुरु झाल्यानंतर लागलीचअभिनेता शाहरुख खानची याची एंट्री झाली. एंट्री झाल्या झाल्या प्रेक्षकांनी फटाके फोडण्यास सुरवात केली. हा सगळं प्रकार पाहून इतर प्रेक्षकांचे धाबे दणाणले. अख्ख्या थिएटरमध्ये फटाकेच फटाके दिसू लागली. यानंतर काही मिनिटात थिएटर मालकांनी शो थांबवला. फटाके फोडल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले. या प्रकरणी मोहन चित्रपटगृहाच्या मालकाने तक्रार दाखल केली. त्यानुसार मालेगावच्या छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेवून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे फटाके फोडणाऱ्या संशयितांना चांगलंच महागात पडलं आहे.
काय घडलं नेमकं?
नाशिकच्या मालेगावमध्ये पुन्हा एकदा सिनेमागृहात फटाके आणि आतिषबाजी करण्याचा प्रकार घडला आहे. शहरातील मोहन थिएटरमध्ये सुरू असलेल्या सलमान खानच्या 'टायगर थ्री' चित्रपटाच्या शेवटच्या शो वेळी फटाके फोडण्यात आले. सलमान खानच्या हुल्लडबाज चाहत्यांनी चक्क चित्रपटगृहातच जोरदार फाटके फोडून आतिषबाजी केली. या प्रकारामुळे सिनेमागृहात उपस्थित इतर प्रेक्षकांची चांगलीच धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले. सलमान, शाहरुख, अमीरखान (Ameer Khan) या तिन्ही खान मंडळींचे चाहते नेहमीच फटाक्यांची आतषबाजी करत हुल्लडबाजी करतात. दरम्यान मालेगावमध्ये चित्रपट गृहात फटाके फोडण्याचे प्रकार सातत्याने होत असल्याने या हुल्लडबाज चाहत्यांना आळा घालण्याची मागणी होत आहे.