संजय राऊत हाजिर हो... दादा भुसे बदनामीप्रकरण , मालेगाव कोर्टाचे राऊतांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याविरोधात सामना मुखपत्रातून बदनामीकारक आणि चुकीचा मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी दाखल केलेल्या मानहानीच्या अर्जावर खुलासा करण्यासाठी न्यायालयानं हे आदेश जारी केले आहेत.
नाशिक : वृत्तपत्रातून चुकीचा व बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केल्याचा आरोप करत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी खासदार संजय राऊतांवर (Sanjay Raut) अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी मालेगाव येथील न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याविरोधात सामना मुखपत्रातून बदनामीकारक आणि चुकीचा मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी दाखल केलेल्या मानहानीच्या अर्जावर खुलासा करण्यासाठी न्यायालयानं हे आदेश जारी केले आहेत.
शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी दै.सामना या वृत्तपत्रात गिरणा सहकारी साखर कारखान्यात मंत्री दादा भुसे यांनी 178 कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा चुकीचा व बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केल्याचा आरोप करत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी खा.संजय राऊत यांच्यावर मालेगावच्या मा.अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. ज्येष्ठ विधीज्ञ सुधीर अक्कर यांच्या मार्फत दाखल केलेल्या या फौजदारी खटल्यात मंत्री दादा भुसे यांची जन सामन्यांमध्ये प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने दै.सामना या वर्तमानपत्रातून बदनामी केल्याने आरोप खा.संजय राऊत यांच्यावर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बंडानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. मे महिन्यात उद्धव ठाकरेंची मालेगावात जाहीर सभा झाली होती. यावेळी बोलताना आपल्या भाषणातून संजय राऊत यांनी गिरणा साखर कारखान्यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत भुसेंवर अप्रत्यक्ष टीका केली होती. त्यानंतर सामना या मुखपत्राच्या मराठी आवृत्तीमधून राऊत यांनी दादा भुसेंवर आरोप केला होता. या खटल्यासंदर्भात खा.संजय राऊत यांना खुलासा करण्यासाठी आज ( 23 ऑक्टोबर ) मालेगाव येथील मे.न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, खा.संजय राऊत हे आज स्वतः मालेगाव न्यायालयात हजर राहतात की, वकिलांमार्फत आपले म्हणणे मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सामना'मध्ये प्रसिद्ध झालेला मूळ लेख हा पुरावा म्हणून भुसे यांच्याकडून सादर करण्यात आला आहे.
ललित पाटील प्रकरणी देखील दादा भुसे- संजय राऊत आमनेसामने
ललित पाटील (Lalit Patil Drug Case) प्रकरणावरून चांगलाच वाद रंगला असून राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहे. सुषमा अंधारे यांनी दादा भुसे यांचे नाव या प्रकरणात घेतल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. त्यानंतर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी तुफान जुगलबंदीही पाहायला मिळाला. या सगळ्यात दादा भुसे यांनी वारंवार आरोपांचे खंडन करत कधीही माझी चौकशी करा, असे सांगितले. तर दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आलेले संजय राऊत यांनी नाशिकमधील सहा आमदारांना हफ्ते मिळत होते, अशी घणाघाती टीका करत दादा भुसे यांनीच ललित पाटीलचा शिवसेनेत प्रवेश केल्याचे देखील ते म्हणाले.
हे ही वाचा :