Nashik News : शेतात गुरं चारण्यासाठी गेला अन् परतलाच नाही, तरुणावर बिबट्याचा हल्ला, पेठ तालुक्यातील घटना
Nashik News : पेठ तालुक्यात गुरे चारण्यासाठी गेलेल्या 32 वर्षीय युवकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.
नाशिक : नाशिकच्या (Nashik) सिन्नर तालुक्यात बिबट हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असताना अशातच पेठ तालुक्यात बिबट हल्ल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका युवकावर बिबट्याने हल्ला (Leopard Attack) केला. या हल्ल्यात 32 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीती पसरल्याचे चित्र आहे.
नाशिकसह जिल्ह्यात (Nashik District) बहुतांश भागात बिबट हल्ले (Lelopard) सातत्याने समोर येत आहे. मागील आठवड्यात सिन्नर (Sinner) तालुक्यात जोगलटेंभी गावात बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर पेठ तालुक्यात ननाशी वनपरिक्षेत्रातील जोगमोडी जवळील हरणगाव शिवारात तरुण शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला चढवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 32 वर्षीय रवींद्र वामन गावित (Ravindra Gavit) याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सकाळी सहा वाजेच्या सुमारास गावानजीक असलेल्या शिवारात गुरे चारण्यासाठी गेलेल्या तरुणावर ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला. याच सुमारास आजूबाजूला कोणी नसल्याने मदत मिळाली नाही, यात त्याचा मृत्यू झाला आहे.
वनविभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पेठ (Peth) तालुक्यातील मौजे हरणगाव येथील रहिवासी रवींद्र वामन गावित या व्यक्तीस हरणगाव-वडबारी रस्त्यालगत असलेल्या फरशी पुलाजवळ नाल्याच्या ठिकाणी श्री गोवर्धन जाधव यांच्या शेतालगत सकाळच्या सुमारास गुरे चारत असताना वन्यप्राण्यांने हल्ला करुन ठार केल्याची घटना घडली आहे. याबाबत वनविभागाचे पथक आणि पोलीस विभागाने तात्काळ येऊन पाहणी करुन पंचनामा करण्यात आलेला आहे. मृताचे ग्रामीण रुग्णालय पेठ इथे शवविच्छेदन करण्यात आले. या ठिकाणी बिबट त्याच्या बछड्यांसह वास्तव्यास असल्याचे गावातील पोलीस पाटील व ग्रामस्थांनी सांगितल्याने वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.
काय घडलं नेमकं?
हरणगाव येथील रवींद्र गावित हा तरुण सकाळच्या सुमारास वडबारी शिवारात आपली जनावरे चालण्यासाठी घेऊन गेला होता. याचवेळी ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली, बिबट्याने त्याला दूर अंतरावर ओढत नेत त्याच्यावर हल्ला केला. रवींद्रने यावेळी आरडाओरडा केला, मात्र आजूबाजूला कोणी नसल्याने त्याला मदत मिळू शकली नाही. बराच वेळ झाला तरी रवींद्र जेवणासाठी घरी आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध करण्यास सुरुवात केली. शोध सुरु असताना शेतालगतच्या एका बांधाजवळ रवींद्रचा मृतदेह आढळून आला. दरम्यान स्थानिक नागरिकांकडून परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली. वनविभागाकडून वनपरिक्षेत्र अधिकारी सविता पाटील यांनी त्याबाबत लवकरच तात्काळ दखल घेऊन उचित कार्यवाही करण्यात येणार असल्याबाबत सांगितले. तसेच वनविभागाकडून स्थानिक ग्रामस्थ आणि लहान मुले यांचे संरक्षणासाठी खबरदारी घेण्याबाबत जनजागृती व आवाहन करण्यात आले आहे.
इतर महत्वाची बातमी :