(Source: ECI/ABP News/ABP Majha)
त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रात आजारी बिबट्याचा मृत्यू, मृत्यूचे वाढते प्रमाण चिंताजनक..
Nashik News : काही दिवसांपूर्वीच त्र्यंबक परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
Nashik Latest Marathi News Update : नाशिकसह जिल्ह्यात बिबट्याचं दर्शन त्याचबरोबर ग्रामीण भागातील सततचे हल्ले हे नित्याचं झालं आहे. त्याचबरोबर अलीकडच्या काही वर्षात बिबट्याचे मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे परिसरात बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना घडली आहे.
काही दिवसांपूर्वीच त्र्यंबकच्या वेळ म्हणजे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर काही दिवसातच या बिबट्याला वनविभागाला रेस्क्यू करण्यात यश आले होते. अशातच काल दुपारच्या सुमारास अंबोली शिवारातील वाघदरा येथे बिबट्या मृतावस्थेत आढळला आहे. वन विभागाने घटनास्थळी दाखल होत बिबट्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ताब्यात घेतला.
त्र्यंबकेश्वर जवळील अंबोली परिसरात राहणारे नंदू मेढे हे गव्हाच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता, त्यांना बिबट्या झोपलेल्या अवस्थेत दिसला. सुरुवातीला ते लांब राहून काही हालचाल होते का, हे बघत होते. मात्र, 15 मिनिटे कुठल्याही प्रकारची हालचाल दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी हिंमत करून थोडे जवळून पाहिले असता, त्यांना बिबट्या मृतावस्थेत आढळला. त्यांनी या घटनेची माहिती तत्काळ पोलिस पाटील ज्ञानेश्वर मेढे यांना कळविली. मेढे यांनी खात्री करून ही माहिती वन विभागाला दिली.
दरम्यान वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्याची पाहणी केली. त्यानुसार अंतर्गत जखमेमुळे बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. बिबट्याला ताब्यात घेत बिबट्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ताब्यात घेतला. यावेळी त्र्यंबकेश्वर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पवार, वनपरिमंडळ अधिकारी एम. पी चव्हाण, वनरक्षक के. एन. महाले, के. वाय. दळवी, बी. व्ही. दिवे, एन. बी. निकम आदी उपस्थित होते.
निफाड तालुक्यात बिबट्या रेस्क्यू...
निफाड तालुक्यातील सुंदरपूर आणि काथरगाव परिसरात गेल्या महिनाभरापासून वावर असलेल्या बिबट्याला अखेर रेस्क्यू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसह नागरिकांना बिबट्याचा संचार दिसून येत असल्याने वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार वनविभागाने पिंजरा लावल्यानंतर बिबट्या रेस्क्यू झाला आहे. यानंतर स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.