Nashik Crime : येवल्यातील 'त्या' प्रकरणाला वेगळं वळण, मारहाण झालेल्या तरुणावरच पोक्सो गुन्हा दाखल
Nashik Crime News : येवल्यातील एका तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
नाशिक : येवल्यातील (Yeola) एका तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये (Yeola Police Station) मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या व्हायरल व्हिडिओमुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. मारहाण झालेल्या तरुणावरच पोक्सोअंतर्गत (pocso) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येवल्यात एका दलित समाजाच्या तरुणाला अर्धनग्न अवस्थेत जबर मारहाण करण्यात आली होती. ही घटना 17 जून रोजी घडली होती. याबाबत पीडित कुटुंबीयांनी गावगुंडांच्या धाकापोटी पोलीस तक्रार दाखल केली नव्हती. मात्र सामाजिक कार्यकर्त्याने धीर दिल्यानंतर पीडित कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. यानंतर मारहाणीचा व्हिडिओ ऑल इंडिया पँथर सेनेकडून ट्विट करण्यात आला आणि राज्यभरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली.
मारहाण झालेल्या तरुणावरच पोक्सो गुन्हा दाखल
आता या प्रकरणाला नवीन वळण लागले असून ज्या मुलाला मारहाण झाली त्याच्याच विरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण करणाऱ्यांच्या मुलीला तो त्रास देत होता. म्हणून रागाच्या भरात त्याला मारहाण झाली असून जातिवादाचा यात कुठलाही संबंध नाही, असा खुलासा मुलीच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.
...तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
दरम्यान, ऑल इंडिया पँथर सेनेकडून या मारहाणीचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता. हा व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांना सोशल मीडियावर (Social Media) टॅग देखील करण्यात आला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपींना अटक करावी. तसेच पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे. पीडित तरुण भयभीत झाला आहे. त्याची जगण्याची उमेद संपली आहे. त्याला वाचवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. त्याला आर्थिक मदत करावी, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केली होती. आरोपींना अटक न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेकडून देण्यात आला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
हृदयद्रावक! वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना काळाचा घाला, दोन मुली, जावयाचा मृत्यू, मालेगावातील घटना