Nashik News: मोठी बातमी: जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने अंगावर डिझेल ओतून वृद्धाला जिवंत जाळले; निफाडमधील हादरवणारी घटना
Crime News: कचेश्वर नागरे यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबीयांनीच त्यांच्यावर डिझेल टाकून त्यांना पेटवून दिले. यानंतर नागरे यांच्या कुटुंबीयांनी जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
नाशिक: जमिनीच्या मालकीवरुन सुरु असलेला वाद विकोपाला गेल्यामुळे नाशिक जिल्ह्यात (Nashik Crime) एका वृ्द्ध व्यक्तीला जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. निफाड तालुक्यात हा प्रकार घडला आहे. येथील थडी सारोळे गावातील कचेश्वर नागरे (वय 80) यांच्या अंगावर सख्ख्या भावाच्या कुटुंबीयांनीच डिझेल टाकून त्यांना पेटवून दिले. यामध्ये कचेश्वर नागरे (Kacheshwar Nagre) 95 टक्के भाजले होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, कचेश्वर नागरे यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबीयांनीच त्यांच्यावर डिझेल टाकून त्यांना पेटवून दिले. यानंतर नागरे यांच्या कुटुंबीयांनी जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
या घटनेबाबत कचेश्वर नागरे यांचा मुलगा संजय नागरे यांनी माहिती दिली. गेल्या सात-आठ वर्षांपासून थडी सरोळे गावात नांदूर मध्यमेश्वर चांगदेव महादू नगरे आणि कचेश्वर महादू नागरे यांच्यात शेतीचा वाद सुरु होता. मात्र, माझे वडील कचेश्वर महादू नांगरे आणि आई जिजाबाई नांगरे वयोवृद्ध असून एकटेच राहत होते. माझा भाऊ शेजारी राहत होता, पण तो कामासाठी बाहेर गेला होता. याचाच फायदा घेत माझ्या वडिलांवर डिझेलसदृश पदार्थ फेकून तिकडून पळ काढला, असे संजय नागरे यांनी सांगितले. आता पोलीस याप्रकरणात काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
नेमका वाद काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरे बंधूंमध्ये शेतामधील वडिलोपार्जित विहिरीवरुन वाद आहे. कचेश्वर नागरे हे मंगळवारी शेतातील घराजवळ साफसफाई करत होते. ते घरात एकटे होते. हीच संधी साधून त्यांचा धाकटा भाऊ चांगदेव नगरे आणि भावजई आणि पुतण्यांनी कचेश्वर नागरे यांच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना पेटवून दिले. आगीच्या ज्वालांनी वेढल्यानंतर कचेश्वर नागरे वाचण्यासाठी सैरभैर पळायला लागले. त्यांचा आवाज ऐकून कचेश्वर नागरे यांचे कुटुंबीय धावत बाहेर आले. तोपर्यंत चांगदेव नागरे आणि त्याचे कुटुंब तिथून पसार झाले होते. यानंतर कचेश्वर नागरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, 95 टक्के भाजल्यामुळे कचेश्वर नागरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आणखी वाचा
Worli Hit and Run Case : 60 तासांचा खेळ, 15 मिनिटांत खलास; पोलिसांना कसा सापडला आरोपी मिहीर शाह?