(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nylon Manja : नायलॉन मांजा विक्रेत्यांवर संक्रांत, नाशकात पुन्हा दोन कारवाया; 'इतक्या' लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Nashik Crime News : नाशिक पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. दोन वेगळ्या कारवाईत 237 नायलॉन मांजा गट्टू जप्त केले आहेत.
Nylon Manja नाशिक : नाशिक पोलिसांची (Nashik Police) नायलॉन मांजा विक्रेत्यांवर करडी नजर आहे. याआधी नाशिक पोलिसांनी नायलॉन मांजा (Nylon Manja) विक्री करणाऱ्या तब्बल 42 जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे. आता पोलिसांनी पुन्हा दोन कारवाया करत दोन मांजा विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. एकाकडून 1 लाख 72 हजार रुपये किमतीचे 215 गट्टू तर दुसऱ्याकडून 13 हजार 500 रुपये किमतीचे २२ नायलॉन मांजाचे गट्टू, असा एकूण 1 लाख 85 हजार रुपयांचे 237 गट्टू जप्त करण्यात आले आहेत.
पतंगाच्या मांजामुळे पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास धोका निर्माण होतो. पक्षी, प्राणी, नागरिक, बालके, वयोवृद्ध, वाहनस्वार जखमी होण्याचे अथवा प्राण गमाविण्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. तुटलेला मांजा विजेच्या तांरामध्ये अडकून काही ठिकाणी आगी देखील लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून दि. 23 जानेवारीपर्यंत नायलॉन मांजा (Nylon Manja) विक्री व वापरावर मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा
गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने मुंबई नाका परिसरातील बजाज शोरूमजवळ धाड घालून तब्बल 1 लाख 72 हजार रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे 215 गट्टू जप्त केले आहेत. नायलॉन मांजा विक्रेत्यांचा तपास सुरू असताना रविवारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अंमलदार नितीन जगताप व विलास चारोस्कर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. हरी विहार सोसायटीच्या गेट जवळील चहाच्या टपरीजवळ, बजाज शोरूमच्या मागे, मुंबई नाका येथे एक जण बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी येणार होता.
ही माहिती कळताच त्यांनी वरिष्ठांना खबर दिली व वपोनि विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. चेतन श्रीवंत, पो. ना. मिलिंदसिंग परदेशी, पोलीस अंमलदार राजेश राठोड, राहुल पालखेडे, नितीन जगताप, विलास चारोस्कर यांच्या पथकाने बजाज शोरूम परिसरात सापळा रचला.
नायलॉन मांजाचे 215 गट्टू हस्तगत
अरबाज फिरोज शेख (24, रा. भद्रकाली, जुने नाशिक) हा येताच त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एका प्लास्टिकच्या गोणीमध्ये व खाकी रंगाच्या बॉक्समध्ये असलेले 215 नग बंदी असलेला मोनो फाईटर, मोनो काईट, गो इंडिया गो कंपनीचे नायलॉन मांजा असे 1 लाख 72 हजार रुपये किमतीचे 215 गट्टू हस्तगत केले.
अहमद काझीचा शोध सुरु
त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने सदरचा मांजा हा अहमद हुसून जहीद काझी (रा. बांद्रा, मुंबई) याच्याकडून आणल्याचे सांगितले. या माहितीनुसार पोलिसांनी अरबाज फिरोज शेख (रा. भद्रकाली, जुने नाशिक) व अहमद हुसून जहीद काझी (रा. बांद्रा, मुंबई) यांच्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईचा नॉयलॉन मांजा विक्रेता अहमद काझी याचा पोलीस शोध घेत आहेत.
दुसऱ्या कारवाईत 13 हजारांचा नायलॉन मांजा जप्त
दरम्यान, मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वडाळा रोड येथील हिरवेनगरच्या साई साया सोसायटीजवळ एक इसमास नायलॉन मांजाची विक्री करताना पकडले. त्याच्याकडून रुपये 13 हजार 500 रुपये किमतीचे २२ नायलॉन मांजाचे गट्टू जप्त करण्यात आले. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा