Nashik Crime News : यवतमाळहून नाशिकला सहलीसाठी आलेल्या शिक्षक, विद्यार्थ्यांचे 18 मोबाईल चोरणारा अखेर जेरबंद; 'या' कारणामुळे झाली चोराची मोठी अडचण
Nashik News : यवतमाळ येथून नाशिकला सहलीसाठी आलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरणाऱ्या भामट्यास भद्रकाली पोलिसांना अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेले 18 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
Nashik Crime News नाशिक : यवतमाळ (yavatmal) येथून नाशिकला (Nashik News) सहलीसाठी आलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरणाऱ्या भामट्यास भद्रकाली पोलिसांना (Bhadrakali Police Station) बेड्या ठोकण्यात यश आले आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेले 18 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरणी (ता. यवतमाळ) येथील नारायण लीला इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक आणि विद्यार्थी असे एकूण ९५ जण सहलीसाठी नाशिकला आले होते. त्यांनी गेल्यावर्षी 25 ऑक्टोबर 2023 रोजी नाशिकमधील विविध धार्मिक स्थळांसह पर्यटन स्थळांना भेट दिली होती. नाशिकमध्ये सहलीला आलेले शिक्षक आणि विद्यार्थी गाडगे महाराज धर्मशाळा येथे मुक्कामासाठी थांबले होते.
सीसीटीव्हीच्या आधारे पटवली ओळख
यावेळी रात्री संशयित शफिक तोफिक शेख (३६, रा. मालेगाव) याने त्या शिक्षक आणि विद्याथ्यांचे तब्बल १८ मोबाईल आणि दोन पाकीट चोरले होते. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीनंतर भद्रकाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरु केला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांनी संशयिताची ओळख पटवली होती.
गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत संशयित जेरबंद
त्यानंतर गुन्हे शोध पथक तीन महिन्यांपासून संशयिताचा शोध घेत होते. पथकातील अंमलदार सागर निकुंभ यांना संशयित द्वारका भागात असल्याची गुप्त माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, कर्मचारी नरेंद्र जाधव, संदीप शेळके, लक्ष्मण ठेपणे, सागर निकुंभ, धनंजय हासे, महेशकुमार बोरसे, योगेश माळी, नारायण गवळी यांनी द्वारका भागात सापळा रचला आणि संशयितास ताब्यात घेतले.
18 मोबाईल हस्तगत
संशयिताची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरीचे मोबाईल त्याने मालेगाव येथे ठेवल्याचे चौकशीत उघड झाल्याने पथकाने मालेगावमधून 1 लाख 50 हजार किमतीचे तब्बल १८ मोबाईल हस्तगत केले आहेत.
'या' कारणामुळे चोराची झाली अडचण
चोरलेले मोबाईल हे फोर जी असल्याने चोराची मोठी अडचण झाली होती. त्याच्याकडून ते फोन कोणी विकत घेत नसल्याने त्याने आपल्या घरीच मोबाईल लववून ठेवले होते, असे पोलीस तपासात समोर आल्याची माहिती भद्रकाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांनी दिली. तसेच संशयिताने यापूर्वीदेखील 40 मोबाईल चोरले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
आणखी वाचा
Nashik Police Transfer : शहरासह ग्रामीण पोलीस दलात खांदेपालट, 'इतक्या' अधिकाऱ्यांच्या बदल्या