रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Nashik Crime News : रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकले म्हणून टवाळखोरांना थेट पोलिसावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.
नाशिक : शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नाशिकमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकवर (Assistant Sub Inspector of Police) हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भर रस्त्यात चाकूने पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करण्यात आला. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून खून, खुनाचा प्रयत्न प्रयत्न आणि टोळक्यांचा हैदोस अशा गंभीर घटना नाशिकमध्ये (Nashik Crime News) घडत आहेत. काल पंचवटी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नामदेव सोनवणे (Namdev Sonawane) हे घरी जात होते. त्यावेळी त्यांना रस्त्यावर काही टवाळखोर हातामध्ये शस्त्र घेऊन उच्छाद मांडताना दिसले.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकवर हल्ला
ही बाब सोनवणे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी टवाळखोरांना हटकण्याचा प्रयत्न केला. यावेळी टवाळखोरांनी थेट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांच्यावर चाकूने हल्ला केला. मात्र सोनवणे हे जखमी होऊन देखील त्यांनी संशयित आरोपींना पकडले आणि त्यांना पंचवटी पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटी पोलीस अधिक तपास करत आहेत.
वाढती गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान
दरम्यान नाशिकमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारी अल्पवयीन मुलांचा समावेश लक्षणीय आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यात आता खाकी वर्दीतील पोलिसावरच नाशिकमध्ये हल्ला झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिकमधील वाढती गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
हाणामारी मिटवायला गेलेल्या पोलिसांना संशय आला अन् मुले पळवणारी टोळी गजाआड, दोन चिमुकल्यांची सुटका