(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भुजबळांच्या उमेदवारीची चर्चा असतानाच मनोज जरांगे उद्या नाशकात येणार, मराठा समाजाकडून उमेदवाराची घोषणा?
Chhagan Bhujbal vs Manoj Jarange : लोकसभेसाठी छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा असतानाच मनोज जरांगे पाटील हे उद्या नाशिक दौऱ्यावर येत आहे. जरांगे नाशिकमधून काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Nashik Loksabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघाचा (Nashik Lok Sabha Constituency) तिढा आज सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आज छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) उमेदवारी दिली जाईल, असे सूत्रांकडून समजते. मात्र भुजबळांच्या उमेदवारीची चर्चा सुरु असतानाच उद्या (दि. 09) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) नाशिक दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे नाशिकचे राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पाश्वभूमीवर आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात दौरे सुरू केले आहेत. एकीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू असताना सोमवारी (दि.८) मनोज जरांगे पाटील हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते नांदूरशिंगोटे येथील गोपीनाथ गडालाही भेट देणार आहेत.
भुजबळांच्या उमेदवारीसाठी महायुती पायघड्या का घालते?
तसेच, छगन भुजबळांच्या उमेदवारीला सकल मराठा समाजाकडून जोरदार विरोध केला जात आहे. काल नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची (Sakal Maratha Samaj) पत्रकार परिषद पार पडली. या बैठकीत सकल मराठा समाजाचे नेते करण गायकर यांनी एखाद्या समाजाला हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांच्या उमेदवारीसाठी महायुती पायघड्या का घालते? असा प्रश्न उपस्थित केला.
भुजबळ मराठा समाजाच्या विरोधात - करण गायकर
आम्ही पंकजा मुंडे (Pankaja Munde), महादेव जानकर (mahadev Jankar) यांच्या उमेदवारीला विरोध केला नाही. भुजबळ यांच्याच विरोधात का, तर ते समाजाच्या विरोधात आहेत. मराठा समाजाला डिवचल्यास महायुतीला (Mahayuti) 48 मतदारसंघात परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही करण गायकर यांनी दिला आहे.
...तर मराठा समाज भुजबळांविरोधात उमेदवार उभा करणार
दरम्यान, छगन भुजबळ यांनी जर लोकसभा निवडणूक लढवली तर मराठा समाज त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करणार, अशी घोषणा सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे. आता उद्या मनोज जरांगे पाटील नाशिकमध्ये येत असून ते नाशिकमध्ये मराठा समाजाचा उमेदवार घोषित करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या