(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी : 'या' एका अटीवर खडसेंची घरवापसी; शरद पवारांना धक्का देण्यासाठी भाजपचा मास्टर प्लॅन
Eknath Khadse Join BJP : केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाने खडसे कुटुंबाला पक्षात पुन्हा घेतांना एकनाथ खडसे यांच्यासमोर एक अट ठेवली आहे. याबाबत दिल्लीतील नेत्यांची खडसे यांच्यासोबत चर्चा देखील झाली आहे.
Eknath Khadse Join BJP : शरद पवार गटाचे (Sharad Pawar group) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची घरवापसी होणार असून, ते पुन्हा एकदा भाजपमध्ये (BJP) प्रवेश करत आहेत. थेट दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करून खडसे यांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र, केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाने खडसे कुटुंबाला (Khadse Family) पक्षात पुन्हा घेतांना एकनाथ खडसे यांच्यासमोर एक अट ठेवली आहे. याबाबत दिल्लीतील नेत्यांची खडसे यांच्यासोबत चर्चा देखील झाली आहे. विशेष म्हणजे खडसे यांच्यासमोर ठेवण्यात आलेली अट पाहता शरद पवारांना (Sharad Pawar) धक्का देण्याचा भाजपचा मास्टर प्लॅन (Master Plan) असल्याची चर्चा आहे.
मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपात पुन्हा प्रवेश करत असल्याच्या बातम्या येत होत्या. आता यावर शिक्कामोर्तब झाला असून, स्वतः खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती 'एबीपी माझा'ला दिली आहे. पण, पक्ष प्रवेश करतांना एकनाथ खडसे यांच्यासमोर एक अट ठेवण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोट्यातून मिळालेल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यानंतरचा भाजपमध्ये सहभागी व्हावं. तसेच त्या बदल्यात एकनाथ खडसे यांच्या आमदारकीच्या जागी रोहिणी खडसे यांची उरलेल्या कालावधीसाठी पाठवणी केली जाणार आहे. यासाठी खडसे यांच्याकडून देखील होकार देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
असा आहे भाजपचा मास्टर प्लॅन...
विशेष म्हणजे खडसे यांना पक्षात घेतांना भाजपने शरद पवारांना धक्का देण्याचा मास्टर प्लॅन देखील आखला आहे. तर, एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे आमदार आणि त्यांच्या जागी भाजपच्या आमदार म्हणून रोहिणी खडसे कसे जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पण, याबाबत देखील भाजपने प्लॅन आखला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या विधानपरिषदेत शरद पवार गटाचे केवळ तीन आमदार असून, यामध्ये एकनाथ खडसे स्वत:, आमदार अरुण अण्णा लाड आणि शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिल्यास आपोआपच शरद पवार गटाचे विधानपरिषदेतील संख्याबळ कमी होईल. परिणामी ती जागा विधानपरिषदेत मोठ्या संख्येने असणाऱ्या भाजपकडे जाईल. विशेष म्हणजे भाजप रोहिणी खडसे यांची त्याच जागेवर वर्णी लावू इच्छित असल्याची माहिती मिळत आहे.
मी शरदचंद्र पवार साहेबांसोबतच : रोहिणी खडसे
एकीकडे एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले असतानाच दुसरीकडे त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. याबाबत रोहिणी खडसे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करीत आहे, मी याच पक्षात आहे व भविष्यातही याच पक्षात राहणार आहे. मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच, असे रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :
मोठी बातमी : ठरलं! अखेर एकनाथ खडसे घरवापसी करणार, भाजप प्रवेशाला अजित पवारांचा अप्रत्यक्ष दुजोरा