मालेगावात तीन दिवस मटण शॉप, कत्तलखाने बंद, संभाजीनगरमध्येही 15 ऑगस्टला कुलूप; महापालिकेचे आदेश
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध परवाना रद्द, दंड किंवा गुन्हा दाखल अशाप्रकारे कठोर कारवाई करण्याचा इशाराही महापालिका प्रशासनाकडून आदेशात देण्यात आला आहे.

नाशिक : सणासुदीच्या काळात कत्तलखाने व मांसविक्री बंद ठेवण्याची मागणी करत प्रशासनाला निवेदन दिले जात आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात काही हिंदू संघटना व बांधवांकडून ही मागणी केली जात असून मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) यासंदर्भाने निर्णयही घेण्यात आला आहे. धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर मालेगाव महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, मालेगाव (Malegaon) शहरातील सर्व खासगी कत्तलखाने, म्हैस मांस विक्रेते, बकरा मटन व कोंबडी मटन विक्रेते यांनी आपली दुकाने 15, 20 आणि 27 ऑगस्ट या दिवशी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, छत्रपती संभाजीनगरमध्येही 15 ऑगस्ट रोजी शहरातील सर्व कत्तलखाने बंद राहणार आहेत.
महानगरपालिकेच्या आदेशानुसार 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, श्रीकृष्ण जयंती 20 ऑगस्ट आणि जैन पर्युषण पर्व व 27 ऑगस्ट श्री गणेश चतुर्थी, जैन संवत्सरी असल्याने या तिन्ही दिवशी सर्व मांस दुकाने, कत्तलखाने आणि संबंधित व्यवसाय पूर्ण दिवस बंद ठेवण्यात यावे. धार्मिक सौहार्द, सार्वजनिक शांतता आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन तसेच केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध परवाना रद्द, दंड किंवा गुन्हा दाखल अशाप्रकारे कठोर कारवाई करण्याचा इशाराही महापालिका प्रशासनाकडून आदेशात देण्यात आला आहे.
संभाजीनगरमध्ये 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद
दरम्यान, दुसरीकडे 15 ऑगस्ट रोजी शहरातील सर्व कत्तलखाने बंद राहणार आहेत, असे आदेशच छत्रपती संभाजी नगर
महापालिकेने काढले आहेत. जन्माष्टमी आणि जैन धर्मियांचे पर्युषण पर्व सुरू होत असल्याने महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
आवश्यकता असेल तर निर्णय घेऊ - गोडसे
खाटीक समाजाने चिकन मटण कत्तल आणि विक्री निर्णयावर केडीएमसी (कल्याण-डोंबिवली महापालिका) महापालिका आयुक्तांना निवेदन दिले असून या संदर्भात चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी सांगितले. या सर्क्युलरमध्ये कत्तलखाने बंद ठेवणे हा उद्देश आहे, कुठल्याही व्यक्तीच्या खाण्यावर बंदी नाही. दरवर्षीप्रमाणे हे सर्क्युलर उपायुक्तांनी जाहीर केले आहे, मास विक्री बंद करण्याचा हा निर्णय बऱ्याच दिवसांचा आहे. अशा पद्धतीचे निर्णय घेणे मागील काही वर्षापासून प्रशासकांना दिले होते, त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे. विविध स्तरावर स्थानिक महापालिका परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकते, हा निर्णय मागील 1988 पासून घेण्यात आलेला आहे. दरवर्षीप्रमाणे तो राबविण्यात येत आहे, हा निर्णय नव्याने घेतलेला नसून यावर्षी लोक भावना लक्षात घेऊन आयुक्तांच्या निदर्शनात आणून देऊन त्याप्रमाणे पुढील निर्णय घेण्याची आवश्यकता असेल तर निर्णय घेऊ, असे योगेश गोडसे यांनी सांगितले.
15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा सण, धार्मिक नाही
15 ऑगस्ट हा धार्मिक सण नसून स्वातंत्र्याचा सण आहे. त्यादिवशी कोणाला काय खायचं ते ज्याचा त्याचा संवैधानिक अधिकार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी म्हटले. तसेच, असा दिलेला अधिकार कोणी मोडीत काढीत असेल तर त्याचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जाहीर निषेध करतो, असेही रविंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.
हेही वाचा
राज ठाकरे सध्यातरी आमच्या आघाडीत नाहीत, रमेश चैनिथल्लांचे मविआबाबतही मोठं वक्तव्य
























