Shourya Patil Sangli : सांगलीच्या शौर्यने आयुष्य का संपवलं? वडिलांनी सगळं सांगितलं
Shaurya Patil: दिल्लीतील (Delhi) सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून दहावीत शिकत असलेल्या मराठी विद्यार्थ्याने मंगळवारी मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. शौर्य प्रदीप पाटील (Shaurya Patil), असे पीडित विद्यार्थ्याचे नाव असून तो नवी दिल्लीतील राजीवनगर भागात राहत होता. शौर्य प्रदीप पाटील हा मूळचा सांगली (Sangli) जिह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी आहे. त्याचे वडील प्रदीप पाटील हे सोने-चांदी गलाई व्यवसाय निमित्त गेल्या अनेक वर्षापासून दिल्ली येथे स्थायिक आहेत. त्यामुळे शौर्य हा त्यांच्या कुटुंबीयांसह दिल्लीतील राजीव नगर भागात भागात वास्तव्यास होता. आता या प्रकरणावरून शौर्य पाटीलच्या शाळेतील पालकांनी शिक्षकांवर सनसनाटी आरोप केलाय.
Shaurya Patil: नेमकं काय म्हणाले पालक?
शौर्यच्या मित्राच्या आईने म्हटले आहे की, त्याला त्रास होत होता. मुलं म्हणत आहेत की, त्याच्या मनात आत्महत्येचे विचार आले होते. तो त्यासाठी शाळेच्या समुपदेशकांनाही भेटला होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर शौर्याच्या शाळेतील एक पालक म्हणाले की, माझ्या मुलालाला पण असाच त्रास होतो. सारखं सारखं पालकांना शाळेत बोलावतात. मी स्वतः खूप तणावात आहे. मी माझ्या मुलाला घेऊन आत्महत्येचा विचार केला होता, असा आरोप त्यांनी केला. तर दुसऱ्या पालकांनी माझ्या मुलगा आठ दिवस घरी आहे. तो शाळेत यायला तयार नाही. हे लोक त्रास देतात, छळ करतात, असा आरोप केलाय. तसेच, हे लोक असेच छळ करतात. आमच्याही मुलांच्या तक्रारी आहेत. शाळेत कोणतीही सुनावणी होत नाही, असे देखील एका पालकाने म्हटले आहे. त्यामुळे आता शाळा प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
























