Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये बोगस मतदान? महाविकास आघाडीच्या आरोपाने खळबळ
Nashik lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघात अनेक मतदान केंद्रांवर बोगस मतदान सुरु असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. यामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Nashik Lok Sabha Election Voting : नाशिक लोकसभा मतदारसंघात आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आज सकाळपासून अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. आता नाशिकमधील अनेक मतदान केंद्रांवर बोगस मतदान (Bogus Voting) सुरु असल्याचा धक्कादायक आरोप महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) करण्यात आला आहे. यामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse), महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje), अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांच्या तिरंगी लढत होत आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
नाशिकमध्ये बोगस मतदान, महाविकास आघाडीचा आरोप
नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. अनेक मतदान केंद्रांवर बोगस वोटिंगच्या घटना घडत आहेत. नाशिकच्या रायगड चौक (Raigad Chauk) परिसरात देखील मतदान केंद्रावर बोगस वोटिंग झाल्याचा आरोप, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. तसेच कार्यकर्ते आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये अनेक ठिकाणी बाचावाची झाल्याचे दिसून आले आहे. तर काही ठिकाणी मतदार यादीतून मतदारांचे नावे गायब झाल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला आहे.
महायुतीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत हुज्जत
तर, सिडको (Cidco) परिसरातील मतदान केंद्रावर महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे. मतदान केंद्रात जेवणाचे डबे घेऊन जाण्यावरून महायुतीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत हुज्जत घातली. यामुळे सिडकोतील मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नाशिकमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 39.41 टक्के मतदान
नाशिक लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 39.41 टक्के इतके मतदान झाले आहेत. त्यामध्ये नाशिक मध्य मतदारसंघात 40.21 टक्के, देवळाली मतदारसंघात 40.20 टक्के, नाशिक पश्चिममध्ये 24.72 टक्के, नाशिक पूर्वमध्ये 38.12 टक्के इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये 44.77 टक्के आणि सिन्नर मतदारसंघांमध्ये 45.30 टक्के मतदान झाले आहे.
शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल
दरम्यान, नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वरच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रवर मतदान केले. मतदान केल्यानंतर शांतिगिरी महाराजांनी आपल्या गळ्यातील हार ईव्हीएम मशीनला घातला.यामुळे शांतीगिरी महाराजांवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा