Nashik Ganeshotsav : गणेशोत्सव मंडळांना दिलासा; परवानगी शुल्क माफ; नाशिक महापालिकेची नवीन नियमावली
Nashik Ganeshotsav : गणेशोत्सव (Ganeshotsav) 2022 करीता मनपा जागांवर उभारणी केलेले मंडप, स्टेज, कमान यांना परवाना शुल्क माफ करण्यात आल्याने नाशिकच्या (Nashik) गणेश मंडळांना दिलासा मिळाला आहे.
Nashik Ganeshotsav : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव (Ganeshotsav) 2022 करीता मनपा जागांवर उभारणी केलेले मंडप, स्टेज, कमान यांना परवाना शुल्क माफ करणेबाबत सर्व महानगरपालिकांना (Nashik NMC) निर्देश दिले होते. त्यामुळे नाशिकच्या (Nashik) गणेश मंडळांना दिलासा मिळाला आहे.
यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी नाशिक पालिकेने आता नव्याने सुधारित नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार गणेशोत्सव मंडळांना आकारण्यात येणारी सर्व शुल्के माफ करण्यात आली आहेत. तसेच आधी भरलेल्या शुल्काचा परतावाही केला जाणार आहे. मूर्तिकारांनाही दिलासा देताना त्यांच्या मंडपांना लागू असलेले शुल्कही माफ करण्यात आले आहे. गेली दोन वर्षे गणेशोत्सवावरही करोना व टाळेबंदीचे सावट होते. त्यामुळे गणेशोत्सवावरही अनेक निर्बंध घालण्यात आले होते. मूर्तीची उंची, कार्यकर्त्यांची संख्या इत्यादी निर्बंधांमुळे अनेक मंडळांनी दोन वर्षे गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला. यंदा करोना व टाळेबंदीचे सावट नसल्यामुळे करोनापूर्व काळाप्रमाणेच गणेशोत्सव साजरा होणार आहे.
दरम्यान या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गणेशोत्सव 2022 साठी परवाना शुल्क माफ करण्याबाबत आज दि. 20 ऑगस्ट रोजी निर्णय घेतला आहे. महापालिकेत आज ठरावाद्वारे नाशिक शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव 2022 करीता महानगरपालिकेच्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात येणारे मंडप/स्टेज, कमान इत्यादिंचे परवाना शुल्क चालू आर्थिक वर्षाकरीता माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव मंडळांसाठी हा मोठा दिलासा आहे.
नाशिक महापालिकेचे पत्रक जाहीर
दरम्यान 31 ऑगस्टला गणेश चतुर्थी असून त्याकरिता सार्वजनिक मंडळांना परवानगी देण्याची प्रक्रिया पालिका प्रशासनाने सुरू केली. परवानग्यांसाठी एक खिडकी योजना सुरू केली होती. त्यानुसार नाशिक महापालिकेची प्रक्रिया सुरूही झाली. मात्र दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन सर्व निर्बंध हटवण्याचे व शुल्क माफ करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पालिकेने आता नवीन नियमावली जाहीर केली आहे. या आदेशाची अंमलबजावणी आज दि. 20 ऑगस्टपासून होत आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी हा निर्णय लागू असल्याचे नाशिक महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.
गणेश मंडळांना दिलासा
तर नुकतीच गणेश मंडळाची बैठक पार पडली होती. यामध्ये महापालिका प्रशासन आणि गणेश मंडळाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले आहे. तसेच एक खिडकी योजनाही सुरु करण्यात आली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश मंडळाच्या सर्व परवाना शुल्क माफ करण्यात आल्याने गणेश मंडळांनी समाधान व्यक्त केले आहे.