Nashik News : नाशिकच्या मासिक पाळी प्रकरणात 'ट्विस्ट', वृक्षारोपणाच्या दिवशी मुलगीच गैरहजर
Nashik News : नाशिकच्या (Nashik) त्र्यंबक तालुक्यात (Trimbbakeshwer) काही दिवसांपूर्वीच्या मासिक पाळी (Period) प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून असा काही प्रकार घडलाच नसल्याचे अहवालातून समोर आले आहे.

Nashik News : नाशिकच्या (Nashik) त्र्यंबक तालुक्यात (Trimbbakeshwer) काही दिवसांपूर्वी मासिक पाळी (Period) प्रकरण चांगलेच गाजले होते. नाशिक जिल्ह्यातच नव्हे राज्यभरात या प्रकरणाची चर्चा होती. मात्र आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून असा काही प्रकार घडलाच नसल्याचे अहवालातून समोर आले आहे.
मागील आठवड्यात नाशिकच्या आदिवासी विकास भवनमध्ये (Adiwasi Vikas Bhawan) एका मुलीची तक्रार आली. या तक्रारीनुसार त्र्यंबक तालुक्यातील देवगाव आश्रम शाळेत (Ashram School) शिकत असताना शिक्षकाने गैरवर्तन केल्याचा आरोप संबंधित मुलीने केला होता. मासिक पाळी आली म्हणून सदर शिक्षकाने वृक्षारोपण करण्यापासून रोखल्याचे मुलीने सांगितले होते. त्यानंतर माध्यमांनी दखल घेतल्याने हे प्रकरण राजभर गाजले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यापर्यत हे प्रकरण पोहचले.
दरम्यान या प्रकरणाची चौकशीचे आदेश आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी दिले. दरम्यान, आदिवासी आयुक्तांमार्फत या घटनेची गंभीर दखल घेत चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशीनंतर समितीने सादर केलेल्या अहवालात धक्कादायक बाब उघड झाली असून विद्यार्थिनीने शिक्षकावर केलेले आरोप चुकीचे असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार चौकशी आधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वर्ष मीना यांनी अप्पर आयुक्तांकडे अहवाल सादर केला. अहवालानुसार संबंधित शिक्षक निर्दोष असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे तक्रारदार मुलगीच दोन महिन्यांपासून शाळेत सतत गैरहजर राहिल्याने कारवाईच्या भीतीतून विद्यार्थिनीने आरोप करताना घडल्या प्रकाराचा बनाव केला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील आश्रम शाळेत हा प्रकार घडला होता. मासिक पाळी आलेल्या विद्यार्थिनीच्या हातून वृक्षारोपण करू नये झाड जगत नाही असे येथील शिक्षकाने म्हटले होते. यानंतर संबंधित मुलीने थेट नाशिक येथील आदिवासी विकास भवन येथे जाऊन अधिकाऱ्यांना याबाबत तक्रार दिली होती. त्यामुळे या प्रकरणावरून राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. दरम्यान, आदिवासी आयुक्तांमार्फत या घटनेची गंभीर दखल घेत चौकशी समिती नेमण्यात आली होती.
चौकशी अहवाल काय म्हणतो
आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांनी या घटनेची चौकशी केली. त्यात संबंधित शिक्षक निर्दोष असल्याचा अहवाल चौकशी अधिकारी तसेच प्रकल्प अधिकाऱ्यांनी अप्पर आयुक्तांकडे सादर केला आहे. यावेळी मीना यांनी शाळेचा हजेरी पट तपासत चौकशीला सुरुवात केली. ज्या दिवशी वृक्षारोपण झाले त्याच दिवशी ही विद्यार्थिनी शाळेत गैरहजर असल्याचे समोर आले. ती विद्यार्थिनी जून महिन्यात चार दिवस तर जुलै महिन्यात फक्त तीन दिवस शाळेत हजर असल्याचे समोर आले आहे. गैरहजर असल्यामुळे वर्गशिक्षकांनी तिला जाब विचारला होता. तसेच यापुढे शाळेत बसू न देण्याचाही इशारादेखील दिला होता. त्यामुळे या विद्यार्थिनीने कारवाईच्या भीतीपोटी मासिक पाळीमुळे आपल्याला वृक्षारोपणापासून रोखल्याचा बनाव केल्याची शक्यता वर्तविली जात आहे.























