Nashik Dajiba Veer : नवसाला पावणारा दाजीबा वीर, धुळवडीला मिरवणुकीची तीनशे वर्षांची परंपरा, काय आहे आख्यायिका?
Nashik Dajiba Veer : नाशिकमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाला वीर दाजिबा मिरवणूक काढण्याची परंपरा आहे.
Nashik Dajiba Veer : नाशिकमध्ये (Nashik) होळीच्या (Holi 2023) दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाला वीर दाजिबा मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. जुन्या नाशिक परिसरातील बाशिंगे वीर अशी या वीरांची ख्याती असून विविध देवांची वेशभूषा ते परिधान करतात. तब्बल तीनशे वर्षांपासूनची ही परंपरा आहे. नेमकी काय असते दाजीबा वीरांची कथा हे जाणून घेऊया...
मुंबई (Mumbai) पुण्यासारख्या शहरात धुलीवंदनाच्या दिवशी सध्या पद्धतीने धुळवड (Dhulivandan) साजरी केली. जाते मात्र नाशिक शहरात ज्या प्रकारे धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या शहरात धुळवडीच्या दिवशी अनोखी परंपरा आहे. आज सर्वत्र धुळवड साजरी केली जात आहे. नाशिक शहरात धुलिवंदनाला मात्र विशेष महत्त्व असून शहरातून दाजिबा वीराची (Dajiba Veer) मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. देवीदेवतांचे अवतार धारण करून पारंपरिक पध्दतीने जुन्या नाशिक परिसरातून दाजिबा वीराच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत असते. तीनशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या या वीर मिरवणुकीचे नेतृत्व पिढ्यांन पिढ्या करते आहे. हे दाजिबा वीर नवसाला पावणारा असल्याची भावना असून मिरवणूक मार्गावर तसेच घरोघरी जाऊन वीराची भाविक मनोभावे पूजा केली जाते.
अशी असते मिरवणूक...
जुन्या नाशिक (Old Nashik) परिसरातील दाजीबा वीर अर्थातच बाशिंगे वीर (Bashinge Veer) अशी या वीरांची ख्याती असून विविध देवांची वेशभूषा ते परिधान करतात. डोक्याला भरजरी वस्त्रे, कानात सोन्याच्या पगड्या, हातात सोन्याचे कडे, पायात जोडा असा वेश धारण करून वाजत गाजत या वीर दाजीबाची मिरवणूक निघते. घरासमोर रांगोळी काढत तसेच ठिकठिकाणी औक्षण करत या दाजिबांचे स्वागत केले जाते, दाजिबांवर फुलांचा वर्षावही केला जातो. हे दाजीबा नवसाला पावणारे असून त्यांचे दर्शन घेतल्याने सर्व दुःख दूर होऊन मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी आख्यायिका आहे. तीनशे वर्षांपासूनची ही परंपरा असून जून्या नाशकातील बेलगावकर घराण्याला हा मान देण्यात आलाय. जुन्या नाशिकमधून या मिरवणुकीला सुरुवात होऊन जूनी तांबट लेन, रविवार पेठ मार्गे गंगाघाटावरून परत जुन्या नाशिकमध्ये या मिरवणुकीचा शेवट होतो. दुपारी तीन वाजता निघालेली मिरवणूक दुसऱ्या दिवशी पहाटे पर्यंत सुरु असते.
दाजीबा मिरवणुकीची आख्यायिका....
नाशिक जवळच असलेल्या दिंडोरी तालुल्यातील जानोरी गावात एक गवळी राहात होता. खंडेराव आद्यदैवत असल्याने गवळी खंडेरायाची निस्सीम भक्ती करत होता. गावात दूध घालून झाल्यावर केवळ ईश्वरसेवेत आपला वेळ घालवणे असा त्याचा नित्यक्रम होता. वयाच्या 16 व्या वर्षी लग्न ठरते आणि अंगाला हळद लागल्यानंतर दुसर्या दिवशी कर्म हीच सेवा म्हणत हा गवळी दूध घालण्यासाठी कावड आणि कुत्र्यासह निघतो. वाटेतच अज्ञाताकडून या गवळ्यावर हल्ला होतो आणि या हल्ल्यात गवळ्याचे निधन होते. त्यावेळी दु:खी झालेले कुटुंबीय घरी परतत असताना गावात वाद्ये वाजण्यास सुरूवात होते. ज्याठिकाणी गवळी खंडेरायाची पूजा करीत असे त्याठिकाणी त्यांची प्रतिमा दिसू लागली आणि ती बोलूदेखील लागली. यावेळी जो कोणी माझी राहिलेली इच्छा पूर्ण करतील त्यांची मी इच्छा पूर्ण करेल, अशी आख्यायिका सांगितली जाते.
'बाशिंगे वीर' आणि 'दाजीबा वीर'
नाशिक शहराला परंपरा लाभलेल्या वीरांची मिरवणूक आज विविध भागांतून निघणार असून, ज्यांच्या घरात वीरांचे टाक आहेत. या आख्यायिकेनुसार हळदीचा नवरदेव बाशिंग लावून दरवर्षी उपवर पत्नीच्या शोधात फिरत असतो. लग्न मंडपात गेल्यावर दाजी म्हणून त्यांना 'दाजीबा वीर' तर हळद लावल्यावर बाशिंगे लावून मिरवतात म्हणून 'बाशिंगे वीर' असा प्रघात आहे. या बाशिंगे वीराची समाधी दिंडोरी येथील तळोदा येथे असून होळीच्या दिवशी याठिकाणी रात्री पूजा केली जात असल्याची आख्यायिका आहे. हा दिवस फाल्गुन वद्य प्रतिपदेचा असल्याने या दिवसापासून 'दाजिबा वीराची'* मिरवणूक काढण्याची प्रथा सुरू आहे.