Nashik Crime : दिंडोरी तालुक्यात वणीच्या बसस्टॅण्डसमोर एकाला संपवलं, नाशिक जिल्ह्यातील घटना
Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात वणी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे.
Nashik Crime : नाशिक शहर पोलिसांसह (Nashik Police) ग्रामीण पोलिसांना गुन्हेगार सातत्याने आव्हान देत असून पोलीस प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे. मात्र यात पोलीस प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचे वारंवार घडणाऱ्या खुनाच्या (Murder) घटनांनी अधोरेखित होत आहे. नाशिक जिल्ह्यातील वणी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे.
एकीकडे पोलीस प्रशासन म्हटलं कि गुन्हेगारांना आजही घाम फुटतो, असं म्हटलं जात. मात्र दुसरीकडे गुन्हेगारीचं एवढी वाढली कि पोलिसांना घाम फुटण्याची वेळ आली आहे. सातत्याने होणाऱ्या घटनांनी शहर तसेच जिल्हा हादरत आहे. कौटुंबिक वाद, नवरा बायकोचे भांडण, पूर्ववैमन्यस्य आदी कारणांतून खुनाच्या घटना घडत आहेत. अशातच जिल्ह्यातील दिंडोरी (Dindori Taluka) तालुक्यातील वणी (vani) येथे अज्ञात व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, वणी येथील बसस्थानकात काल मध्यरात्री एक ते चार वाजेच्या सुमारास एका अज्ञात तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह बसस्थानकाच्या स्वच्छतागृहाच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत काटेरी झाडांच्या बाजूला टाकून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यानंतर संशयिताने बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक कार्यालयाचा दरवाजा व खिडकीचे गज वाकवून आतमध्ये प्रवेश केला. खुनाची घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याचा संशय आल्याने संशयिताने पुरावा नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेला लावण्यात आलेले इन्वर्टर काढून नेल्याचे समजते. मात्र डीव्हीआर तसाच राहिल्याने त्यातून घटनेचे रेकॉर्डिंग पोलिसांनी हस्तगत करुन संशयिताचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यात सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपुत, आणि पेठचे उपविभागीय पोलीस अधिकारी फडताळे यांनी घटनास्थळी येत पाहणी केली.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पोलीस उपनिरीक्षक प्रविण उदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध भागात अशा घटना सातत्याने घडत असून गुन्हेगारांकडून पोलिसांना आव्हान दिले जात आहे. असे असतानाही पोलिसांकडून गुन्हेगारांविरुद्ध ठोस कारवाई होत नसल्याची सद्यस्थिती असून त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
खुनाच्या घटनांत वाढ
एकीकडे नाशिक शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसात खुनाच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांना गुन्हेगारीवर अंकुश लावणे जिकिरीचे झाले आहे. एका गुन्ह्याची उकल होत नाही तोच दुसरी घटना घडत असल्याने पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडते कि काय? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. दुसरीकडे अशा घटनांमुळे सामाजिक स्वास्थ बिघडत असून नागरिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे.