Nashik News : टोईंगच्या नावानं चांगभलं! नाशिकची टोईंग झाली बंद, आता थेट जागेवरच दंड
Nashik News : नाशिक शहरात (Nashik) नो पार्किंगमधील वाहनांच्या टोईंगची कारवाई बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Nashik News : नाशिक शहरात (Nashik) नो पार्किंगमधील वाहनांच्या टोइंगची कारवाई बंद करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेतला आहे. टोईंगबाबतचा आदेश बुधवारपासून (15 मार्च) रद्द करण्यात आला आहे. संबंधित वाहनमालकांकडून आता थेट ई-चलानद्वारे दंड वसुली करण्यात येणार आहे.
नाशिक शहरात जशी जशी लोकसंख्या वाढत आहे, त्याचबरोबर वाहनांची संख्या देखील वाढत असून त्यामुळे पार्किंगचा (No Parking) प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे नागरिकांकडून कुठेही वाहन पार्क केले जात असते. परिणामी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर थेट टोईंग व्हॅन (Toing Van) सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र यावर नागरिकांसह स्थानिक पक्षांनी आवाज उठवल्याने अखेर टोईंगचे बस्तान उठवण्यात आले आहे. गेल्या वर्ष दोन वर्षांपासून टोईंगचा मुद्दा नाशिकमध्ये गाजत होता. अखेर नाशिक शहरात आता टोईंग दिसणार नाही, मात्र थेट आपल्या मोबाईलवरच दंडाची (E Chalan) पावती येणार आहे. त्यामुळे नाशिककरांना आणखीच काळजी घ्यावी लागणार आहे.
आता थेट ई-चलानद्वारे दंड वसुली
नाशिक शहरात वाहने उभी करण्यासाठी पुरेशी पार्किंग सुविधा उपलब्ध नसतानाही शहर पोलिसांच्या (Nashik City Police) वाहतूक विभागाकडून टोईंग कारवाई केली जात होती. परंतु, या कारवाईबाबत नागरिक संताप व्यक्त करत होते. टोईंग कर्मचाऱ्यांच्या उद्दामपणामुळे नागरिकांना दीड वर्षापासून मनस्ताप सहन करावा लागत असल्याकडेही पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. वाहने उचलण्यापूर्वी पूर्वसूचना देणे, संपर्क क्रमांक नोंदवण्यासह तीन मिनिटांची मुदत देणे अपेक्षित असताना, तसे होत नसल्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. शहरात वाहने पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध करुन द्यावी किंवा टोईग कारवाई बंद करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. दरम्यान आता टोईंगबाबतचा आदेश रद्द करण्यात आला असून थेट ई-चलानद्वारे दंड वसुली करण्यात येणार आहे.
टोईंग करणार नाही मात्र कारवाई होणार
नो पार्किंगमधील वाहन टोईंग करुन शरणपूर रोडवरील वाहतूक शाखेच्या कार्यालयात नेले जात असत. संबंधित वाहनधारकाने या कार्यालयात जाऊन दंड भरला की त्याचे वाहन सोडण्यात येत असे. आता यापुढे टोईंग केले जाणार नसले तरी कारवाई मात्र सुरुच राहणार आहे. नो पार्किंगमधील वाहने टोईंग करण्यासाठी 7 मार्च रोजी श्रम साफल्य सर्व्हिसेस यांना पोलीस आयुक्तालयाने मुदतवाढ दिली होती. त्यानुसार एजन्सीने कारवाईदेखील सुरु केली. परंतु, यासंबंधीचा आदेश रद्द करण्यात येत असल्याची माहिती पोलीस आयुक्त शिंदे यांनी दिली. यापुढे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत नो पार्किंगमधील वाहने टोईंग करण्यात येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र या वाहनांवर कारवाई
तर टोईंग बंद करण्यात येत असली तरी मात्र थेट दंडात्मक कारवाई कारवाईला सुरवात होणार आहे. जी वाहने नो पार्किंगमध्ये दिसतील. त्यांचा फोटो काढला जाईल. त्या वाहनक्रमांकावरुन मालकाचा तपशील मिळवला जाईल. वाहनमालकाला थेट मोटर वाहन कायद्यान्वये ई-चलानद्वारे दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.