Nashik News : गोदेचा पूर पाहण्यासाठी गर्दी, नाशिकमधील सात पुलांवर 'नो पार्किंग झोन', अन्यथा कायदेशीर कारवाई
Nashik News : गोदावरी नदीवर (Godavari) असलेल्या तब्बल सात पुलांवर व आजूबाजूच्या शंभर मीटर परिसरात पोलीस आयुक्तांच्या (Nashik Police) आदेशानुसार नो पार्किंग झोन (No Parking Zone) करण्यात आला आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) शहरात पावसाने (Rain) उघडीप दिल्याने गोदावरीचा पूर पाहण्यासाठी नाशिककर गर्दी करत आहेत. यामुळे शहरातील होळकर पूल (Holkar Pool) व इतर नदी काठच्या ठिकाणी नाशिककरांसह पर्यटक गर्दी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्तांनी (Nashik CP) महत्वाचा निर्णय घेतला आहे.
सध्या नाशिक शहरात पावसाने ब्रेक घेतला असला तरीही गंगापूर पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे धरणसाठा वाढतो आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून कमी अधिक प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी गोदावरी दुथडी भरून वाहते आहे. गोदावरीचे हे रूप पाहण्यासाठी गोदाकाठ तसेच होळकर पुलावर नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे गोदावरी नदीवर असलेल्या तब्बल सात पुलांवर व त्याच्या आजूबाजूच्या शंभर मीटर परिसरात पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार नो पार्किंग झोन करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात होत असलेला मुसळधार पावसाने काहीअंशी ब्रेक घेतला आहे. गंगापूर धरणातून आज सकाळपासून 07 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. गोदावरी नदीपात्रात विसर्ग करण्यात येत असल्याने गोदावरी नदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हा पूर बघण्याकरता नागरिक मोठ्या संख्येने शहरातील पुलांवर आपली वाहने पार्क करून पूर बघण्यासाठी गर्दी करत आहेत. यामुळे सदर परिसरात अडथळा निर्माण होऊन वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे.
दरम्यान गोदावरी नदी हि शहरातून वाहते. त्यामुळे सोमेश्वर, बापू पूल, होळकर पूल, रामकुंड परिसर, गाडगे महाराज पूल आदी ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे सध्या वाहनांची गर्दी होत असल्याचे लक्षात घेऊन त्याठिकाणची वाहतूक सुरळीत राहण्याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक शहरातील अहिल्याबाई होळकर पूल पंचवटी, गाडगे महाराज पूल पंचवटी, रामवाडी पूल पंचवटी, कन्नमवार पूल पंचवटी, बापू पूल गंगापूर, दसक फुल उपनगर व चेहडी पुल नाशिकरोड या ठिकाणी पुलावर व पुलाच्या दोन्ही बाजूस शंभर मीटर अंतरावर पुढील आदेश येईपर्यंत नो पार्किंग झोन करण्याचे आदेश पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिले आहेत. तरी नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे देखील पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
धरणातील आजचा विसर्ग
दरम्यान जिल्ह्यात पाऊस ओसरला असला तरीही बहुतांश धरणांतुन अद्यापही विसर्ग सुरु आहे. मात्र विसर्ग घटविण्यात आल्याने पूरस्थिती निवळण्यास मदत झाली. आज दुपारी बारा वाजेनंतर गंगापूरमधून 7128, दारणातून 10670, कडवा 3233, आळंदी 961, पालखेड 7956, करंजवण 1352, वाघाड 2991, पुणेगाव 653, नांदूरमध्यमेश्वर 44768 क्युसेकचा विसर्ग सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पावसाने विश्रांती घेतल्याने शहरातून वाहणाऱ्या गोदावरीची पातळी काही अंशी कमी झाली आहे.
इथे नो पार्किंग झोन
नाशिक शहरातील अहिल्याबाई होळकर पूल पंचवटी, गाडगे महाराज पूल पंचवटी, रामवाडी पूल पंचवटी, कन्नमवार पूल पंचवटी, बापू पूल गंगापूर, दसक फुल उपनगर व चेहडी पुल नाशिकरोड या ठिकाणी पुलावर व पुलाच्या दोन्ही बाजूस शंभर मीटर अंतरावर पुढील आदेश येईपर्यंत नो पार्किंग झोन करण्याचे आदेश पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिले आहेत. तरी नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे देखील पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.