Sharad Pawar Nashik : पवार आणि भुजबळांच्या बॅनरवर एकेमकांचे फोटो, नेमकं कोण कोणासोबत, कार्यकर्ते संभ्रमात!
Sharad Pawar Nashik : 'भुजबळ संपर्क' कार्यालयाबाहेरील शरद पवार यांचे फोटो असलेले फलकच गायब करण्यात आले.
Chhagan Bhujbal : आज नाशिक (Nashik) शहरासह येवल्यात राष्ट्रवादीत (Maharashtra NCP) आमनेसामने पाहायला मिळत असून नवनिर्वाचित मंत्री छगन भुजबळ यांचे शहरात स्वागत होणार आहे तर शरद पवार (Sharad Pawar) यांची सायंकाळी जाहीर सभा येवल्यात होत आहे. या दोन्ही गटाकडील नेत्यांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. दोन्ही गटाच्या बॅनरवर शरद पवारांसह भुजबळांचे (Chhagan Bhujbal) फोटो पाहायला मिळत आहे. तर येवल्यातील भुजबळांचे बॅनर सकाळी लावल्यानंतर सायंकाळी काढण्यात आले आहेत. मात्र या डिजिटल फलकामुळे कार्यकर्ते मात्र आजही संभ्रमात असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांच्या आज होणाऱ्या येवल्यातील सभेच्या पार्श्वभूमीवर येवला (Yeola) शहरात स्वागताचे डिजिटल फलक लागले असून या फलकावरील फोटोमुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने दर्शनी भागात शरद पवार यांच्या स्वागताचा फलक लावला असून या फलकावर अजित पवार (Ajit Pawar) व छगन भूजबळ यांचे फोटो लावण्यात आलेले आहे. तर आ.छगन भुजबळ यांची मंत्रीपदी निवड झाल्याने लागलेल्या बाजार समितीच्या फलकावर जेष्ठ नेते माणिकराव शिंदे यांचा फोटो लागल्याने नेमकं कोण कोणासोबत आहे , हेच समजत नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहे. मात्र सद्यस्थितीत हे फलक काढून टाकण्यात आले आहेत.
येवल्याचे आमदार तथा नुकतेच कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेले छगन भुजबळ यांच्या येवला येथील संपर्क कार्यालयावर लागलेल्या दोन शुभेच्छा फलकांवर शरद पवार यांचें फोटो लागलेले होते. शरद पवार यांनी माझा फोटो लावू नये असे सांगून देखील या फलकावर फोटो झळकत असल्याने व माध्यमांवर आलेल्या 'येवल्यातील फलकांमध्ये संभ्रम ' अशा आशयाच्या बातम्या झळकल्यानंतर सायंकाळी 'भुजबळ संपर्क ' कार्यालयाबाहेरील शरद पवार यांचे फोटो असलेले फलकच गायब करण्यात आले. कार्यालयाबाहेर लावलेल्या एकाही फलकावर आता शरद पवार यांचा फोटो नाही. सायंकाळच्या सुमारास हे फोटो गायब झाल्याचे दिसून आले. मात्र यानंतरही कार्यकर्ते मात्र अद्यापही संभ्रमात असून नेमकं कोण कोणासोबत आहे, हे कळायला मार्ग नसल्याचे दिसून येत आहे.
छगन भुजबळांचे शक्तिप्रदर्शन
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ आज प्रथमच नाशिकमध्ये येत आहेत. एवढंच नाही तर जोरदार शक्तिप्रदर्शन करत ते राष्ट्रवादीच्या नाशिक कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, मुंबई ते नाशिक या प्रवासात त्यांचं ठाणे, शहापूर, इगतपुरी आणि पाथर्डी फाटा येथे जल्लोषात स्वागत करण्यात येईल. तर इगतपुरी आणि पाथर्डी फाटा येथे त्यांची स्वागत रॅली निघणार आहे. तर शरद पवार येवल्याकडे रवाना झाले असून ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात येत आहे. राज्यातल्या राजकीय महाभूकंपानंतर आज नाशिकच्या येवलामध्ये राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची आज संध्याकाळी 4 वाजता सभा होत आहे. शरद पवार आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.