(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Leopard News : खळबळजनक! नाशिकच्या लहवितला आढळला मृतावस्थेत बिबट्या, तर म्हसरूळला बिबट्याचा हल्ला
Nashik Leopard News : नाशिक (Nashik) तालुक्यातील लहवित येथील एका शेतात आज सकाळी मृतावस्थेतील बिबट्याचा (Leopard) बछडा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Nashik Leopard News : नाशिक (Nashik) तालुक्यातील लहवित येथील एका शेतात आज सकाळी मृतावस्थेतील बिबट्याचा बछडा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा बिबट्या (Leopard) अंदाजे दीड वर्ष वयाचा असल्याचं समजते आहे. हा बिबट्याचा बछडा आजारी असल्याने त्याचा मृत्यु झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नाशिकपासून काही अंतरावर असणाऱ्या लहवित येथे काळे मळा प्रसिद्ध आहे. या काळे मळ्यात उत्तमराव सुखदेव काळे यांची शेती आहे. काळे हे सकाळी शेतात जात असताना घरासमोरच त्यांना मृतावस्थेतील बिबट्याचा बछडा दिसून आला. घाबरलेल्या काळे यांनी तात्काळ ग्रामस्थांना बोलवून घेतले. ग्रामस्थांनी याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक विजयसिंह पाटील आणि वनमजुर अंबादास जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर परिस्थितीची पाहणी करीत माहिती घेत मयत बिबट्याचा बछड्याचा मृतदेह ताब्यात घेतला. आणि त्यानंतर या मयत बिबट्याच्या बछड्यावर गंगापूर येथील शासकीय रोपवाटिकेत अग्निडाग देत अंत्यसंस्कार देखील करण्यात आले.
बिबट्याचा वावर वाढला
शहर परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून यामुळे बिबट हल्ल्याच्या, बिबट विहिरीत पडण्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. मात्र बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून सायंकाळी बाहेर पडणे म्हणजे जीव धोक्यात घालणे असेही नागरिकांकडून सांगितले जात आहे. तर भक्ष्याच्या शोधार्थ किंवा पाण्याच्या शोधार्थ आल्याने अनेकदा बिबट विहिरीत पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच रस्ते दुर्घटना किंवा आजारी पडून अनेक बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडा जखमी
दरम्यान नाशिक शहराजवळील म्हसरूळ आडगाव लिंक रोडजवळ बिबट्याचा हल्ल्यात लहान मुलगा जखमी झाल्याची घटना घडली आहे. परिसरात देशमुख यांच्या मळ्यात साई दीपक देशमुख या चिमुरड्यावर बिबटयाने हल्ला केला आहे. सध्या या मुलावर नाशिक शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.