(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : तू येरे पावसा! दोन महिन्यांपासून नाशिकला पाऊस नाही, पावसासाठी शाळेनं थेट लगानची मॅचचं भरवली!
Nashik Rain : मागील दोन महिन्यांपासून नाशिकसह (Nashik) जिल्ह्यावर पाऊस रुसला की काय? अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाशिक : मागील दोन महिन्यांपासून नाशिकसह (Nashik) जिल्ह्यावर पाऊस रुसला की काय? अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाशिककरांसह शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या विद्या प्रबोधिनी प्रशालेच्या सी.बी.एस.ई विभागामार्फत पावसाला साकडं घालण्यासाठी थेट क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन केल्याचं पाहायला मिळालं. असा तसा क्रिकेटचा सामना (Cricket Match) नाहीतर काही वर्षांपूर्वी आलेल्या लगान (Laggan Movie) चित्रपटाच्या धर्तीवर क्रिकेटचा सामना भरवत पावसाला साकडे घातले आहे.
यंदा जून महिन्याच्या अखेरीस पावसाने (Maharashtra Rain) जोरदार हजेरी लावली. रान शिवार फुलवलं, शेती मातीला बहर आला. याच पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचा हंगाम सुरु केला. मशागत, नागराणीसह लागवडी झाल्या. दुसरीकडे नागरिकही पावसामुळे ओलेचिंब झाले. पर्यटनसहली वाढल्या. मात्र त्यांनतर जी पावसाने दडी मारली ती मारलीच. गेल्या दोन महिन्यापासून नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात रिमझिम पाऊस होतो आहे, मात्र दमदार पाऊस नसल्याने बहुतांश धरणे तहानलेलीच असून शेतकरी सुद्धा आता संकटात सापडला आहे. त्यामुळे वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी अनेकदा वेगवगेळे उपक्रम राबविले जातात. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अनोख्या पद्धतीने वरुणराजाला साकडे घातले आहे.
आज नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरात असलेल्या सीएचएमइ सोसायटी संचलित विद्या प्रबोधिनी प्रशालेच्या सी.बी.एस.ई विभागामार्फत (Bhosala Military School) क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. कारण काय तर पावसाला साकडे घालण्यासाठी. येथील शाळा व्यवस्थापनाकडून आज सकाळी आठ वाजता क्रिकेट मॅचचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅचचे वेगळेपण म्हणजे लगान चित्रपटाप्रमाणे पोशाख घालत सामना खेळविण्यात आला. नाशिकसह जिल्हाभरात पावसाने हजेरी लावावी, सर्वाना ओलेचिंब करावं, शेतकऱ्यांना संकटातून मुक्त करावं, म्हणून या अनोख्या लगान सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागाचे चेअरमन सुयोग शहा, मुख्याध्यापक गोविंद बोराडे हे देखील उपस्थितीत होते.
लगान चित्रपटातील सामना
यावेळी लगान सामन्याप्रमाणे दोन संघाची निवड करण्यात आली होती. विद्या प्रबोधिनी प्रशालेच्या मैदानावर हा सामना खेळविण्यात आला. यात एक संघ लगान चित्रपटातील अमीर खान यांच्या संघाने ज्या पद्धतीने पेहराव केलेला होता, तास पेहरावात दिसून आला. तर दुसरा संघ दैनंदिन सामन्यात असलेल्या ड्रेसकोडमध्ये खेळताना पाहायला मिळाला. या ही अनोखी मॅच पाहण्यासाठी शाळेतील हजारो विद्यार्थ्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे राज्यात सर्वदूर पाऊस असताना नाशिक शहरावर पाऊस रुसला कि काय असं वाटू लागले आहे. दरवर्षी ऑगस्टपर्यंत गोदावरीला दोन ते तीन पूर येऊन जात असत, मात्र यंदा एकही पूर आला नसल्याने नाशिककर काळजीत पडले आहेत, म्हणूनच पावसाला साकडं घालण्यासाठी मॅचचे आयोज केल्याचे शाळा व्यवस्थापन आयोजकांकडून सांगण्यात आले.
शेतकरी संकटात, नाशिककर आस लावून...
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुरवातीच्या पावसावर लागवड केली खरी मात्र त्यानंतर दमदार पाऊस नसल्याने शेती पिके कोमेजून जाऊ लागली आहेत. व पावसाचे दोन महिने संपत आले तरी अद्यापही पावसाचे दमदार आगमन झालेले नाही. त्यामुळे हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आकाशात काळे ढग जमताहेत, तर लगेच ऊन पडते आहे. कधी अधेमधे पावसाची सर येत आहे, तर लगेचच ऊन पडत आहे. ऊन-पावसाच्या खेळाने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला असून, चांगल्या पावसासाठी आभाळाकडे डोळे लावून बसतो आहे. बळिराजा अगतिक झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Nashik Rain: नाशिकमध्ये पावसाची गैरहजेरी; शेतकरी चिंतेत; नाशिककरांना पावसाची प्रतिक्षा