Nashik News : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी दुःखद घटना, विद्यार्थिनीचा मृत्यू
Nashik News : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या प्रभातफेरी दरम्यान दुःखद घटना घडली आहे.
Nashik News : 74वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. अनेक ठिकाणी ध्वजारोहणासह प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. मात्र याच दिवशी नाशिक जिल्ह्यात एक दुःखद घटना घडली. प्रभात फेरीत सहभागी झालेल्या एका विद्यार्थिनीचे दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडली आहे. संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नांदगाव (Nangoan) तालुक्यातील जातेगाव येथील एका शाळेतील ही घटना आहे. पुजा दादासाहेब वाघ (Pooja Wagh) असं या विद्यार्थिनीचे नाव आहे. येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे जनता माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे ग्रामपंचायतीसह शाळेच्या ध्वजारोहणासाठी विद्यालयाकडून प्रभात फेरी काढण्यात आली होती. या प्रभात फेरीत विद्यालयाची नववीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी पुजा दादासाहेब वाघ ही देखील सहभागी होती. प्रभात फेरी सुरू असताना अचानक तिला चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली.
शिक्षकांच्या लक्षात ही बाब येताच तिला उपचारासाठी तात्काळ बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप जायभार यांनी सांगितले. त्यामुळे पुजा हिला नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र नांदगावला घेऊन जात असताना पुजाचे निधन झाले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून या विद्यालयातील पुजा ही अतिअश्यात होतकरू आणि हुशार विद्यार्थिनी होती. मात्र, या घटनेने शाळा, नातेवाईक, गावातील नागरिकांनी दुःख व्यक्त केले आहे.
दरम्यान, पुजाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला जन्मापासूनच श्वास घेण्यास त्रास व्हायचा. तिची तपासणी केली असता तिच्या फुफ्फुसाला छिद्र दिसून आले. त्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचे गरजेचे असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. परंतु, शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच तिचे निधन झाले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. घटनेमुळे विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याकडे चौकशी केली असता विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध प्रकारच्या योजना असतात. त्यातून शक्य तितकी मदत तिच्या बालकांना करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत असेल सर्व नियोजित सांस्कृतिक कार्यक्रम घटनेमुळे रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
घोषणा सुरू असतानाच...
नेहमीप्रमाणे यंदाही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह होता. सकाळी सात विजेच्या सुमारास सर्व शाळेसमोर जमल्यानंतर गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. ही प्रभातफेरी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ध्वजारोहणाचा कार्यक्रमासाठी जात होती. वाटेत विद्यार्थ्यंनाकडून 'प्रजासत्ताक दिन विजयी असो, वंदे मातरम, जय जवान जय किसानचा' नारा दिला जात होता. याच प्रभातफेरीत पुजा देखील आपल्या शाळातील मैत्रिणींबरोबर घोषणा देत होती. मात्र अचानक तिला चक्कर आली आणि होत्याच नव्हतं झालं.