Nashik Crime : सिन्नरमध्ये वृद्धाला संपवलं, खिशात सातबारा, आजूबाजूला लिंबू, अगरबत्ती, पेट्रोलची बाटली!
Nashik Crime : सिन्नरमध्ये वृद्धाच्या मृतदेहाजवळ लिंबू, अगरबत्ती, पेट्रोलची बाटली आणि दहा फूट अंतरावर रक्ताने माखलेला दगड आढळून आले आहे.
Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) सिन्नर तालुक्यातील (Sinnar) नांदूर शिंगोटे येथील चास रोडवर तास खिंडीत एका वृद्धाचा दगडाने ठेचून खून (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे मृतदेहाजवळ लिंबू, अगरबत्ती, पेट्रोलची बाटली आणि दहा फूट अंतरावर रक्ताने माखलेला दगड आढळून आल्याने अंधश्रद्धेतून अघोरी कृत्य करत नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सिन्नर जवळील (Sinnar Taluka) चासखिंडीत रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मंदिरापासून शंभर फूट अंतरावर वन विभागाच्या जागेत निर्जनस्थळावर हा मृतदेह पडलेला होता. गाई चारणाऱ्या गुराख्याने हा प्रकार गावातील नागरिकांना सांगितल्यावर या घटनेचा उलगडा झाला. सरपंच गोपाळ शेळके यांनी नांदूर शिंगोटे दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक आर टी तांदळकर यांना दिलेल्या माहितीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक आर टी तांदळकर, सोनवणे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी मृतदेहाच्या खिशात सातबारा उतारा देखील आढळून आला आहे.
मयत भाऊसाहेब आहेर यांचा भाऊ कैलास रामनाथ आहेर यांनी वावी पोलिसात फिर्याद दिली असून त्यानुसार भाऊसाहेब रामनाथ आहेर हे त्यांची पत्नी मथुराबाई मुलगा एकनाथ यांच्यासह त्यांच्या शेतामध्ये वस्ती करून राहतात. मुलगा एकनाथला दारू पिण्याची सवय असल्याने त्याची दारू सोडवण्यासाठी त्यावर उपचार करण्यासाठी भाऊसाहेब हे नेहमी कुठल्यातरी बाबाकडे जात येत होते. गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास भाऊसाहेब हे घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेले होते. काल सकाळी साडेअकरा वाजता सुमारास लोणी खुर्द गावातील शरद बाबा साहेब आहेर यांना मृतदेह आढळून आला आल्याचे समजले.
दरम्यान शरद आहेर यांनी तात्काळ कैलास आहेर यास फोन करून सांगितले की नांदूर शिंगोटे गावाजवळ एका इसमाच्या खिशात तुमच्या नावाचा सातबारा उतारा मिळाला आहे. 'तसेच त्याचा फोटो माझ्या मोबाईलवर आलेला आहे, मी तुम्हाला पाठवतो' असे म्हणून त्यांनी माझ्या मोबाईलवर मृताचा फोटो पाठवला. त्यानंतर भाऊसाहेब यांनी मृतांची ओळख पटली. त्यानंतर सर्व नातेवाईक हे नांदूर शिंगोटे शिवारात चासखिंडीजवळ पोहोचुन त्यांनी मृताची ओळख पटवली. याबाबत वावी पोलिसात अज्ञात व्यक्त विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातबारा वरून लागला तपास
दरम्यान भाऊसाहेब आहेर हे त्यांची पत्नी मथुराबाई यांच्यासह मुलगा एकनाथ यांच्यासोबत शेतात राहत होते. आहेर हे काही कामानिमित्त बाहेर आले असता काही तासांत त्यांचा मृतदेह आढळून आला. यावेळी त्यांच्या खिशात सातबारा उतारा आढळून आला. पोलिसांना आढळून आलेल्या सातबारा उताऱ्यावर भाऊसाहेब रामनाथ आहेत यांच्या नावाची नोंद होती. मृतदेहाजवळ पडलेल्या दोन फोन पैकी एका फोनवरून संपर्क साधला असता माहित व्यक्ती भाऊसाहेब बाहेरच असल्याचे स्पष्ट झाले, त्यानंतर नातलगांशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलावून घेत मृतदेहाची ओळख पटवली.