Chhagan Bhujbal : जुना इतिहास उकरण्यात अर्थ नाही, बाळासाहेबांचं नाव अशाने पुसलं जाणार नाही, छगन भुजबळांचे प्रत्युत्तर
Chhagan Bhujbal : एका बाजूने बाळासाहेबांचं कौतुक करायचं, तर दुसरीकडे अवमूल्यन करायचे, हे बरोबर नाही, असा टोलाही भुजबळांनी भाजपाला लगावला आहे.
Chhagan Bhujbal : चंद्रकांत पाटील यांच्या (Chandrakant Patil) विधानावरुन मुख्यमंत्री राजीनामा देणार का, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. तर जुना इतिहास उकरण्यात अर्थ नाही, मात्र बाबरी पाडकामातून बाळासाहेबांचं नाव कसं पुसलं जाईल, असा सवाल छगन भुजबळ यांनी विचारला आहे. एका बाजूने बाळासाहेबांचं कौतुक करायचं, तर दुसरीकडे त्यांचे अवमूल्यन करायचे, हे बरोबर नाही, असा टोलाही भाजपाला लगावला आहे.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद (Babri Masjid) पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, अशा आशयाचं वक्तव्य केलं होते. यावर संजय राऊत (Sanjay Raut) प्रत्युत्तर देत म्हणाले की, चंद्रकांत पाटलांनी थेट बाळासाहेबांचा (Balasaheb Thackeray) अपमान केला असून त्यामुळे आता भाजपसोबत मांडीला मांडी लावून बसलेल्या त्या 40 लोकांचे काय म्हणणं आहे? असा प्रश्न विचारत शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "एका बाजूने बाळासाहेबांचं कौतुक करायचं तर दुसरीकडे त्यांचे अवमूल्यन करायचे हे बरोबर नाही. आता त्या गोष्टी का उकरुन काढत आहेत? बाळासाहेबांचं नाव अशाने पुसलं जाणार नाही, असा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगत पाटलांना ठणकावलं आहे.
तसेच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतल्याने राजकारण तापले आहे. यावर देखील भुजबळांनी आपले मत मांडले आहे. ते म्हणाले की, निवडणूक आयोग नियमाप्रमाणे निर्णय घेतला असून त्याचा काही परिणाम होणार नाही. आम्हाला राज्यात चिन्ह आहे, इतर राज्यात चिन्ह मिळेल. आता फक्त चार पाच पक्षांना राष्ट्रीय दर्जा आहे. राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढल्याने राष्ट्रवादीची ताकद काही कमी होत नाही. किंवा कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य भावना जराही नसल्याचे भुजबळ म्हणाले.
जुन्या गोष्टी का उकरुन काढत आहेत?
काही दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादीचे आमदार भाजप संपर्कात असल्याची चर्चा आहे. यावर भुजबळ म्हणाले की, सगळे राजकीय पक्ष एकमेकांच्या संपर्कात असतात. एखाद्या कामासाठी भेटावं लागतं, स्थगिती उठवावी लागते, मी देखील जाऊन भेटलो, त्यामुळे त्यात गैर नाही. तर शरद पवार यांच्या जेपीसीबाबतच्या भूमिकेला समर्थन देत भुजबळ म्हणाले की, भाजपचे प्रतिनिधी जास्त असल्याने त्यांचा फायदा होणारच आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या बाबरी प्रकरणाच्या वक्तव्यावरुन ते म्हणाले की, एका बाजूने बाळासाहेबांचं कौतुक करायचं, तर दुसरीकडे त्यांचे अवमूल्यन करायचे, हे बरोबर नाही. त्यावेळी भाजप नेते म्हणाले, आमचा संबंध नाही. बाळासाहेब म्हणाले मला अभिमान आहे, त्यावेळी विरोधात केस नको म्हणून बाळासाहेब पुढे आले होते. आता त्या गोष्टी का उकरुन काढत आहे? असा सवाल भुजबळ यांनी केला आहे.