Chandrakant Patil on Babri Masjid Demolition : बाबरी कुणी पाडली? एकही शिवसैनिकाचा हात नव्हता : चंद्रकांत पाटील
सोमवारी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेतही चंद्रकांत पाटलांनी बाबरी मशिदीबाबत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
Chandrakant Patil on Babri Masjid Demolition : बाबरी मशीदीबाबत उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. बाबरी मशीद पाडण्यात (Babri Masjid Demolition) एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. एका टीव्ही मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी असेही म्हटले आहे की, त्यावेळी ते स्वतः व्यवस्थापनाशी संबंधित कामाच्या संदर्भात अयोध्येत उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याद्वारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच प्रश्न उपस्थित केला आहे का असंही विचारलं जात आहे.
महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (10 एप्रिल) असा दावा केला की, "6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही कार्यकर्ता घटनास्थळी उपस्थित नव्हता." पाटील यांनी एका प्रादेशिक वृत्तवाहिनीमध्ये बोलताना सांगितलं की, “मला अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने तीन-चार महिने तिथे ठेवले होते. यात सहभाग घेतलेले लोक बजरंग दल, विहिंप (विश्व हिंदू परिषद) किंवा दुर्गा वाहिनीचे होते."
चंद्रकांत पाटील म्हणाले की “आरएसएसची ताकद आमच्या पाठीशी होती पण ती उघडपणे सहभागी झाली नाही. त्यांनी त्यांची काम समविचारी संघटनांना वाटून दिली होती." ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत बाबरी मशीद पाडल्याबद्दल नेहमीच बोलत असतात, पण मनात खरचं प्रश्न पडतो की ते त्यावेळी अयोध्येतही होते का?" असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान सोमवारी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेतही चंद्रकांत पाटलांनी बाबरी मशीदीबाबत शिवसेनेवर निशाणा साधला. बाबरी पाडण्याच्या मागणीला साडेपाचशे वर्षाचा इतिहास आहे. बाबरी पाडण्यामागे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आघाडीवर होते हे सर्वांनी माहिती आहे. त्यात शिवसेना हिंदुत्ववादी म्हणून असतील, पण बाबरी पाडण्याचा प्लॅन सेनाभवनमध्ये केला, असं काही नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.
राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या ( Devendra Fadnavis) अयोध्या दौऱ्यावर संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. “धर्माच्या नावावर जे चालले आहे, आम्ही त्याच्या विरोधात नाही. आम्हीही अनेकवेळा अयोध्येला गेलोय. पण, भाजपाचे लोक कधी आमच्याबरोबर अयोध्येला आले नाहीत. बाबरी मशिद पडली, तेव्हा भाजपावाले आम्हाला सोडून पळून गेले होते. आता गद्दारांचे बोट धरुन अयोध्येला गेले आहेत," असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला होता. यावेळी, संजय राऊतांनी अवकाळीवरुनही राज्य सरकारवर हल्लाबोल केला.