Nashik News : नाशिकची मिसळ जगात भारी! शहरात उभारणार 'क्लीन स्ट्रीट फूड हब', केंद्र सरकारचा उपक्रम
Nashik News : नाशिक शहरात मिसळ फेमस आहे, आता शहरात 'क्लीन स्ट्रीट फूड हब' उभारण्यात येणार आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) म्हटलं की धार्मिक नगरी, ऐतिहासिक नागरी, पर्यटन नगरी त्याचबरोबर नाशिक शहर हे खवय्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. नाशिकची मिसळची जगभरात ओळख आहे. त्यामुळे सिंहस्थ नगरी, वाईन कॅपिटल यांसह आता नाशिक शहराला क्लिन स्ट्रिट फूड हब' अशी नवीन ओळख मिळणार आहे. केंद्र सरकारने (Central Government) फूड हबसाठी नाशिकसह राज्यातील अन्य तीन शहरांची निवड केली आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकदा घराबाहेरचे खाद्यपदार्थ (Street Food) खाल्ले जातात. मात्र अनेकदा ही दुकाने, येथील खाद्यपदार्थ बनवण्याचे साहित्य, खाद्यपदार्थ, कामगार वर्ग याबाबत स्वच्छता पाळली जाते का, हा एक मोठा प्रश्न असतो. आता मात्र, नाशिककरांना (Nashik) स्वच्छ अन्न बाहेरही खाता येणार असून, केंद्र सरकारने देशातील शंभर शहरांची फूड हब या उपक्रमासाठी निवड केली असून महाराष्ट्रात नाशिकसह कोल्हापूर आणि नांदेड या तीन शहरांचा समावेश करण्यात आला आहे. नाशिक शहरात मनपा तीन ठिकाणी फूड हब (Clean Street Food Hub) विकसित करणार असून एका हबसाठी केंद्र सरकार मनपाला एक कोटींचा निधी देणार आहे. लवकरच या योजनेवर काम सुरु करावे, अशा सूचना केंद्राने पत्राद्वारे मनपाला दिल्या आहेत.
शहरातील ठिकठिकाणी चौकाचौकात खाद्यपदार्थांची रेलचेल असते. कामावर जाताना, शहरात फिरत असताना अनेकदा नागरिक अशा खाद्यपदार्थांना पसंती देत असतात. मात्र अनेकदा स्वच्छता पाळली जात नसल्याने आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने रस्त्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थांची अन्न सुरक्षा व स्वच्छता या मुद्यावर फोकस केले आहे. त्या अंतर्गत राज्य सरकार आणि महापालिका यांच्या मदतीने 'क्लीन स्ट्रीट फूड हब'ची निर्मिती केली जात आहे.
काय आहे ही संकल्पना?
'क्लीन स्ट्रीट फूड हब' म्हणजे काय तर शहरातील पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक गजबजलेले स्पाॅट अशा ठिकाणी महापालिकेकडून फूड हब उभारले जातील. त्या ठिकाणी आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन, प्रसाधन गृह, खवय्यांसाठी पार्किंग, आकर्षक विद्युत योजना, साठवण जागा असणे अनिवार्य असणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून एक कोटींचा निधी दिला जाईल. त्यासाठी केंद्र व राज्य 60 : 40 खर्च उचलेल. या फूड हबचे व्यवस्थापन या क्षेत्रात काम करणार्या व अनुभव असणार्या एनजीओमार्फत केले जाईल. तसेच या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्री करणार्या स्टाॅलधारकांना अन्न सुरक्षा व स्वच्छता यासाठी विशेष प्रक्षिशण देण्यात येईल.
शहरात कुठे फूड हब होणार?
नाशिक महापालिका असे तीन फूड हब विकसित करणार असून त्यासाठी गोदाघाट, गंगापूर रोड, तपोवन यासंह काही महत्वाच्या ठिकाणांचा प्रस्तावावर विचार करत आहे. यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रत्येक फूड स्ट्रीट हबसाठी (Nashik Street Food Hub) एक कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात मिसळसह कोंडाजी चिवडा, बुधा जिलेबी, साबुदाणा वडा, पेढा, चाट पदार्थ यांसह विविध खाद्य पदार्थांची चव हटके आहे. येणार्या सिंहस्थापूर्वी फूड हब विकसित केले जाणार आहे. कुंभमेळ्यासाठी देश विदेशातून भाविक, पर्यटक नाशिकला भेट देणार आहेत. त्यांना नाशिकच्या या खाद्य पदार्थाची चव फूडहबमध्ये चाखता येईल. त्यामाध्यमातून जगभरात नाशिकच्या खाद्यपदार्थांची ब्रॅण्डिंग जगभरात होण्यास मदत होईल.
हेही वाचा