Nashik News : 'सिद्धार्थ गौतमांना ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्त झाली, त्या बोधीवृक्षाच्या फांदीचे नाशिकला रोपण!
Nashik News : तथागत गौतम बुद्ध यांना ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्त झाली, त्या बोधीवृक्षाची फांदी नाशिक येथील त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी लावली जाणार आहे.
Nashik News : तथागत गौतम बुद्ध यांना ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्त झाली, त्या बोधीवृक्षाची एक फांदी नाशिक येथील त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी लावली जाणार आहे. यासाठी त्रिरश्मी लेणी येथील बुद्धस्मारकाच्या परिसरात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी बुद्धस्मारकाची पाहणी करून कामकाजाच्या दृष्टीने सूचना केल्या.
संपूर्ण विश्वाला शांती आणि अहिंसेचा संदेश देणार्या भगवान गौतम बुद्धांना ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, त्याच 2300 वर्षे जुन्या बोधीवृक्षाची श्रीलंकेतील अनुराधापुर येथील फांदीचा नाशिक शहरातील बुद्ध स्मारकात सोहळा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी त्रिरश्मी लेणीला भेट देत नियोजित स्थळाची पाहणी केली. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, येत्या ऑक्टोबर महिन्यात देशव्यापी बोधीवृक्ष स्थापना महोत्सव नाशिक शहरात त्रिरश्मी लेणीला महिनाभर होणार आहे. या महोत्सवास श्रीलंका, थायलंड, कोरिया, ब्रम्हदेश, मलेशिया, जापान, तैवान, व्हिएतनाम व कंबोडिया या देशातील अतिमहत्वाच्या व्यक्ती आणि भन्ते व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यादृष्टीने बुद्धस्मारक परिसरात वाहन व्यवस्था, येणाऱ्या बौद्ध उपासकांची निवास, भोजन व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था व इतर सोयी-सुविधांचे नियोजन करण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे.
बोधीवृक्षाचे ऐतिहासिक महत्व असून इ.स.पूर्व 2566 वर्षांपूवी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना निरंजना नदिच्या काठावार बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. त्यामुळे हे बोधीवृक्ष अतिपूजनीय आहे. पुढे सम्राट अशोक यांच्या मुलांनी या बोधीवृक्षाची फांदी श्रीलंकेच्या देवानामप्रिय तिरस यांच्या हस्ते अनुराधापूर येथे स्थापित केली. याच वृक्षाची फांदी नाशिकला मिळवण्यासाठी नाशकातील शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टने त्यासाठी पुढाकार घेतला. श्रीलंकन सरकारशी आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या वृक्षाची फांदी देण्यासाठी तेथील सरकारने तयारी दाखवली. याच बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण नाशिक शहरात करण्यात येणार असल्याने शहराच्या ऐतिहासिक महत्वात भर पडणार असल्याची माहिती शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भदत्न सुगत यांनी यावेळी दिली.
नाशिकच्या त्रिरश्मी लेणींचा इतिहास
महाराष्ट्र हे बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असणारे राज्य आहे. महाराष्ट्रातील त्रिरश्मी लेणी ही नाशिकमधील लेणी असून पांडव लेणी म्हणूनही ओळखले जाते. त्रिरश्मी बौद्ध लेणी ही सुमारे इ.स. पूर्व 200 च्या दरम्यान खोदलेली बौद्ध लेणी आहेत. भारत सरकारने या लेण्यांना महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक 3 एप्रिल, इ.स. 1996 रोजी घोषित केले आहे. सातवाहन राजांनी ही लेणी खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिले असा उल्लेख येथील शिलालेखांत आढळून येतो. सातवाहन आणि क्षत्रप या राजवंशाने त्रिरश्मी लेणी कोरण्यास मदत केली होती. येथील शिलालेख हे त्रिरश्मी लेण्यांचा इतिहास सांगणारा मोलाचा स्रोत आहे. नाशिक या भूभागावर सातवाहन राजांचे अधिराज्य असल्याचे पुरावे पाहायला मिळतात.