ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
विरारच्या अर्नाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले रतिकांत भद्रेशेट्टे हे मागील चार ते पाच महिन्यांपासून नैराश्यात होते. त्यांच्या कुटुंबात एकामागून एक दुःखाचे डोंगर कोसळत होते.
पालघर : माणसाचं आयुष्य ताण-तणावाचं बनलं आहे, कुणाला नोकरी नाही म्हणून तो तणावात आहे. तर कुणला नोकरी आहे म्हणून तो तणावात आहे. प्रत्येकजण आपल्या-आपल्या अडचणी आणि संकटांना सामोरे जात आहेत. मात्र, कुठल्याही अडचणी किंवा संकटांचा पर्याय हा आत्महत्या नाही. तरीही, अनेकजण जीव देण्यासारखं टोकाचं पाऊल उचलतात. विरारच्या अर्नाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक (PSI) रतिकांत भद्रेशेट्टे (वय 35) यांनी आज दुपारच्या सुमारास बोळीज येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आपल्या राहत्या घरच्या छताच्या हुकला चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले. त्यांच्या पशच्यात पत्नी आणि दीड वर्षाची लहान मुलगी आहे. त्यामुळे, त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण (Paithan) तालुक्यात दोन लहान मुलांचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
विरारच्या अर्नाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले रतिकांत भद्रेशेट्टे हे मागील चार ते पाच महिन्यांपासून नैराश्यात होते. त्यांच्या कुटुंबात एकामागून एक दुःखाचे डोंगर कोसळत होते. कोरोना काळात आई वडिलांचं छत्र हरवलं, तर आता काही महिन्यांपूर्वीच दोन्ही भावांचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे, सातत्याने येणाऱ्या दु:खाच्या घटनांनी ते नैराश्यात होते, अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र, आज त्यांनी टोकाचं पाऊल उचलत आपले जीवन संपवले. बोळींज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येच्या कारणांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनं त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून पोलीस दलातूनही हळहळ व्यक्त होत आहे.
पैठणमध्ये दोन लहानग्यांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या आडूळ येथे शेतात दोन भाऊ खेळता-खेळता विहिरीत पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत प्रणव कृष्णा फणसे या 4 वर्षीय मुलाचा आणि त्याचा भाऊ जय कृष्णा फणसे वय 8 वर्षे यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर, दोघांनाही जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण आडुळ गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. चिमुकल्यांच्या निधनाने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून फणसे दु:खाचा डोंगर कोसळला आहे.