महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
Maharashtra Cabinet Ministers List : शिवसेनेची यादी ही मुख्यमंत्र्यांकडे पोहोचली असून राष्ट्रवादीची यादी ही बुधवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून अर्थखातं हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाच मिळणार आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडे नगरविकास खातं देण्यात येणार आहे. गृह आणि महसूल खात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा राहणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. येत्या 24 तासांत खाते वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेची खात्यांची यादी मुख्यमंत्र्यांना पोहोचल्याची माहिती आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची यादी बुधवारी दिली जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसात राज्यपालांना संपूर्ण खातेवाटपाची यादी देणार असल्याची माहिती आहे.
कसे असेल संभाव्य खाते वाटप?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या मंत्रिमंडळात होती ती महत्त्वाची खाती त्या त्या पक्षाकडेच राहणार आहेत. तर शिंदेंना हवं असलेले गृहखातं हे भाजप स्वतःकडे ठेवणार आहे. देवेंद्र फडणवीस हे गृहखातं आपल्याकडेच ठेवणार असल्याची माहिती आहे. तर नगरविकास खातं हे शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेकडे असलेलं उत्पादन शुल्क खातं हे राष्ट्रवादीला जाणार असल्याची माहिती आहे. तर भाजपच्या वाटेचं गृहनिर्माण खातं हे शिवसेनेला देण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीकडे अर्थ खातं जाणार असून ते अजितदादा स्वतःकडे ठेवणार आहेत. तसेच महिला व बालकल्याण खातं हे राष्ट्रवादीकडेच राहणार असून आदिती तटकरे या त्या खात्याच्या मंत्री असणार आहेत अशी माहिती आहे.
गृह आणि महसूल खातं भाजपकडेच
मुख्यमंत्रीपद सोडायला लागल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपल्याला गृह, नगरविकास आणि महसूल खातं मिळावं यासाठी प्रयत्न केला. पण यापैकी नगरविकास खातं हे शिंदेंच्या शिवसेनेला देण्यास भाजपने तयारी दर्शवली. तर गृहखातं कोणत्याही परिस्थितीत भाजपकडेच राहिल याची खबरदारी फडणवीसांनी घेतली. त्याचसोबत महसूल खातं हे शिवसेनेला जाणार अशी चर्चा होती. पण ते खातंही आपल्याकडे ठेवण्यात भाजपने यश मिळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अर्थखातं दादांकडेच
अर्थखातं हे भाजप स्वतःकडे ठेवेल आणि त्या बदल्यात इतर एखादं खातं हे अजितदादांच्या राष्ट्रवादीला देण्यात येईल अशी चर्चा होती. पण अर्थखातं आता अजित पवारांकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच गेल्यावेळी शिवसेनेकडे असलेल्या उत्पादन शुल्क खातं यंदा राष्ट्रवादीने आपल्या पदरात पाडून घेतल्याची खात्रीलायक बातमी आहे.
भाजप-
- गृह
- महसूल
- सार्वजनिक बांधकाम
- पर्यटन
- ऊर्जा
---------
शिवसेना-
- नगरविकास खातं
- गृहनिर्माण
---------
राष्ट्रवादी-
- अर्थ
- महिला आणि बालविकास
- उत्पादन शुल्क
ही बातमी वाचा :