Nashik Bus Fire : नाशिकमधील ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण होणार, दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांचे सखोल चौकशीचे आदेश
Nashik Bus Fire : नाशिकच्या (Nashik) दुर्घटनेबाबत चौकशीअंती संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिला आहे.
Nashik Bus Fire : नाशिकची (Nashik) बस दुर्घटना अतिशय मोठी घटना असून जखमींवर सर्वोतोपरी उपचार करण्यात येतील, शिवाय या घटनेत बारा जणांचा जीव गेला आहे. त्यामुळे अशा घटना पुन्हा होऊ नये, याची देखील दखल शासनाने घेतलेली आहे. घटनास्थळाची पाहणी केली असून याबाबत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीअंती संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिला आहे.
आज पहाटेच्या सुमारास नाशिक शहरातील औरंगाबाद रोडजवळील मिरची हॉटेल परिसरात बसचा भीषण (Nashik Bus Fire) अपघात झाला. ट्रक आणि खाजगी ट्रॅव्हल्स या दोन वाहनांत अपघात होऊन ट्रॅव्हल बसला भीषण आग लागली. पहाटेची वेळ असल्याने अनेकांना मृत्यूने गाठलं. काही वेळेतच ही बस जळून खाक झाली. दरम्यान मुख्यमंत्र्यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाला सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश देऊन ते नाशिकला दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अपघातस्थळी जाऊन पाहणी केली. त्याचबरोबर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात (Nashik civil Hospital) दाखल करण्यात आलेल्या जखमींची विचारपूस केली. तसेच उपस्थित मृतांच्या नातेवाईकांना आधार देत मदत जाहीर केली आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, बस अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून यामध्ये बारा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अशा घटना पुन्हा होऊ नये याची देखील दखल शासनाने घेतलेली आहे. घटनास्थळावरील ब्लॅक स्पॉट पाहणी केली असून यामध्ये कुणाची चूक आहे, याबाबत चौकशी केली जाईल. चौकशीअंती संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. तसेच नाशिक शहरातील अशा प्रकारचे जे काही ब्लॅक स्पॉट आहेत, त्यांचे सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन, विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त संबंधित अधिकाऱ्याना दिल्या आहेत. त्यानुसार पुढील काळात योग्य त्या उपाययोजना अरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, त्याचबरोबर अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी योग्य उपपयोजन राबवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच नाशिक शहरातील ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करण्यात येईल. यासाठी पालकमंत्री, संबंधित प्रशासन या सदंर्भात बैठक घेऊन तो अहवाल तयार करतील. यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, त्या केल्या जातील यामध्ये कुठल्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही. तसेच अपघातांतील जखमींवर पूर्ण उपचार सरकार करणार असून त्यांच्या ऑपरेशननंतरचा खर्च देखील शासन करेल असे आश्वासन देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
नाशिकमधील ब्लॅक स्पॉट सर्वेक्षण
दरम्यान नाशिक बस पघातानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नाशिकमधील ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी वारंवार अपघात घडतात. त्या ठिकाणी योग्य त्या उपायोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राज्यातही अनेक भागात ब्लॅक स्पॉट असून ते देखील सर्वेक्षणांती पुढे येणार आहे. यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल, राज्यात होणाया आळा बसविण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर असेल.